FDA Raid Nashik: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा नाशिकमध्ये सर्जिकल स्ट्राईक! 5 प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सवर कारवाई, तपासणीत काय काय आढळलं?
काही दिवसांपूर्वीच एफडीएने पुण्यातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल वैशाली तसेच हॉटेल रुपालीवर कारवाई करत थेट परवाना रद्द केला होता. या कारवाईने पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते, अशातच आता एफडीएने नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई केली आहे.

Maharashtra FDA Nashik Raid News: तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच एफडीएने पुण्यातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल वैशाली तसेच हॉटेल रुपालीवर कारवाई करत थेट परवाना रद्द केला होता. या कारवाईने पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते, अशातच आता एफडीएने नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई केली आहे.
नाशिकमध्ये एफडीएची सर्वात मोठी कारवाई 5 हॉटेल्सला दणका!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने 5 नामांकित हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे. कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेचे नोंदी प्रमाणपत्र एफडीएने निलंबित केले आहे. तसेच तुषार, शामसुंदर आणि विहार या 3 नामांकित मिसळ हॉटेलवरही छापे टाकलेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या गंभीर तक्रारींनंतर एफडीएने ही कारवाई केली आहे.
एफडीएने नाशिकमधील जुना गंगापूर नाका, गंगापूर रोडवर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल विहारवर कारवाई केली आहे. हॉटेल विहारच्या तपासणीमध्ये अधिकाऱ्यांना अस्वच्छता आढळली तसेच अन्न सुरक्षा व मानक नियमांचे उल्लंघन, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी किटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळला ज्यामुळे ही कारवाई केली. त्याचसोबत सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेल शामसुंदरवरही कारवाई केली आहे. हॉटेल शामसुंदरमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या.
दुर्गा कॅफे, तुषार मिसळवरही कारवाईचा बडगा!
त्यासोबतच एफडीएने कॉलेज रोडवर असलेल्या दुर्गा कॅफेलाही दणका दिला आहे. अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले. तसेच मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले. शहरातील असवारी चौकासमोर असलेल्या तुषार मिसळलाही एफडीएने चांगलाच दणका दिला आहे.
तुषार मिसळमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा, मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले. त्याचबरोबर आडगाव फाटा येथे असलेल्या हॉटेल महाराजा काठियावाडीवरही एफडीएने कारवाई केली आहे. हॉटेल महाराजा काठियावाडीच्या आस्थापनेमध्ये अस्वच्छता आढळली, स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली, तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ व किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले, त्यानंतर एफडीएने कारवाई केली आहे.