
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या धाराशिव जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देत लोकोपयोगी कीट दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. या मदतीसाठी खास १२ साहित्यांचे कीट तयार करण्यात आले आहे. हे कीट घेऊन १८ टेम्पो धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत. या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या या किटमध्ये साधारण १२ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी यासाठी देण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या मदतीचे काही स्तरातून कौतुक होत असले तरी मदतीच्या किटवर स्वतःचा फोटो लावल्याने त्यांच्यावर टीकाही होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच यावरुन टीका केली आहे. आता आपला सही, शिक्का, चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याच काम सुरु आहे. हा किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि तुम्ही भगव्या पिशव्या त्यावर तुमचे फोटो, पक्षाचं चिन्ह हे प्रचार करण्याचं कोणतं तंत्र या लोकांनी अवलंबल आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या दृष्टीने उद्वस्त झाला आहे, हे या सरकारच्या लक्षात आलय का?. जे आपल्या दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत त्यांना किती मोठं नुकसान झालय हे कळलय का?. ही मतं मागण्याची, प्रचार करण्याची वेळ नाहीय, हे भाजप आणि मिंधे गटाला समजलं पाहिजे” असं संजय राऊतांनी म्हटले होते.
दरम्यान सध्या सुरू असलेल्या या मदतकार्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण त्याचबरोबर मदतीच्या पद्धतीवरून सुरू असलेल्या या वादामुळे राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याकडे आणि त्यांनी केलेल्या मदतीकडे आता राज्याचे लक्ष लागून आहे.