एकीकडे पाऊस, दुसरीकडे कवडीमोल भाव, झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी

परतीच्या पावसामुळे अनेक भागात झेंडूच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जी फुले शिल्लक राहिली, त्यांनाही बाजारात ग्राहक नसल्याने योग्य भाव मिळत नाही, असेही काही व्यापारी सांगत आहेत.

एकीकडे पाऊस, दुसरीकडे कवडीमोल भाव, झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी
| Updated on: Sep 26, 2025 | 1:16 AM

नवरात्रौत्सव म्हणजे झेंडूच्या फुलांचा सण, पण यंदा परतीच्या पावसाने आणि ग्राहक नसल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी पाहायला मिळत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांना भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी ज्या झेंडूच्या क्रेटला ५०० रुपये भाव मिळतो, तो यंदा केवळ ५० रुपयांना विकावा लागत आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, आणि नगर जिल्ह्यांतून शेतकरी मोठ्या आशेने आपला माल घेऊन कल्याण बाजार समितीमध्ये आले होते. दादरनंतर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलांची बाजारपेठ म्हणून कल्याणची ओळख आहे. नवरात्रीच्या काळात झेंडूला मोठी मागणी असते. चांगला दरही मिळतो, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र परतीच्या पावसामुळे अनेक भागात झेंडूच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जी फुले शिल्लक राहिली, त्यांनाही बाजारात ग्राहक नसल्याने योग्य भाव मिळत नाही, असेही काही व्यापारी सांगत आहेत.

शासनाने तातडीने मदत करावी

शेतकऱ्यांनी पीक घेण्यासाठी, फुले तोडण्यासाठी ७० ते ८० रुपये मजुरी दिली. तसेच, वाहतुकीसाठी ७ ते ८ हजार रुपयांचा खर्च करून ते आपला माल घेऊन आले. मात्र, बाजारात अपेक्षित ग्राहक नसल्याने त्यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना तर फुले विकता न आल्यामुळे ती फेकून देऊन रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची मेहनत आणि केलेला खर्च दोन्ही वाया गेला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ते करत आहेत.

परतीच्या पावसाने सर्व काही उद्ध्वस्त

सणासुदीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असले, तरी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र हताशेचे अश्रू दिसत आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समितीमध्ये झेंडू विकायला आलेल्या एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्च करून आम्ही झेंडूची लागवड केली. नवरात्रीच्या काळात भाव चांगला मिळेल अशी आशा होती, पण परतीच्या पावसाने सर्व काही उद्ध्वस्त केले. जे काही पीक वाचले, त्याला बाजारात ग्राहक नसल्याने कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये. शासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला मदत करावी, असे एका शेतकऱ्याने म्हटले.

यंदा पावसाने फुलांच्या दर्जावर परिणाम केला आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. मागणी कमी असल्याने आम्हालाही शेतकऱ्यांकडून माल कमी भावात खरेदी करावा लागत आहे. ही परिस्थिती केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही, तर आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांसाठीही अडचणीची आहे, अशी प्रतिक्रिया एका व्यापाऱ्याने दिली. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.  शासनाकडून मदतीची अपेक्षा पूर्ण न झाल्यास, या शेतकरी वर्गासमोर मोठे आव्हान उभे राहील.