आप कतार में हो… मुंबईपासून बुलढाण्यापर्यंत आजही रांगाच रांगा… अफवांचा बाजार आणि रोजची कटकट सुरूच

इराण-इस्रायल युद्धामुळे महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई ते बुलढाणा पर्यंतच्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर व गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पुरवठा कमी झाल्याने व अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन भरत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ऑटो चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आप कतार में हो... मुंबईपासून बुलढाण्यापर्यंत आजही रांगाच रांगा... अफवांचा बाजार आणि रोजची कटकट सुरूच
भीतीपोटी पेट्रोल पंपावर रांगा
| Updated on: Mar 27, 2026 | 11:46 AM

इराण- इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे संपूर्ण जग होरपळून गेलं आहे. अनेक देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला महाराष्ट्रही अपवाद राहिलेला नाही. रोजच राज्यातील जनतेला सकाळीच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नाही तर गॅस एजन्सीच्या कार्यालयात घरगुती गॅस घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागत आहे. रणरणतं ऊन आणि भली मोठी रांग, यामुळे नागरिकांचा घामटा निघाला आहे. त्यातच अफवांचा बाजार एवढा उठलाय की लोक भीतीपोटी आणखीनच पेट्रोल पंपावर रांगा लावताना दिसत आहे. मुंबईपासून ते बुलढाण्यापर्यंत हेच चित्र दिसत आहे.

पेट्रोलची आवक कमी होताच गर्दी

इराण इजराइल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका मुंबईतील पेट्रोल पंपावर सुद्धा पांचालकांना बसताना पाहायला मिळत आहे. आधी दोन ट्रक म्हणजे 40 हजार लिटर पेट्रोल कंपन्यांकडून पंपावर यायचं. मात्र आत्ता केवळ 20 हजार लिटर पेट्रोल येतंय. पेट्रोल संपेल अशी अफवा काहींनी पसरवल्याने बाईकस्वार आणि कारचालकांची पंपावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे नागरिक अतिरिक्त पेट्रोल भरत असल्याची तक्रार पंप कर्मचारी करत आहेत. पेट्रोल संपणार नाही, गर्दी करू नका असंही आवाहन करण्यात येत आहे.

ठाण्यापासून बदलापूरपर्यंत बोंब

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर येथील पेट्रोल पंपावर सकाळपासूनच भली मोठी रांग लागली आहे. खासकरून बाईकस्वारांनी पेट्रोल पंपावर सर्वाधिक गर्दी केली आहे. अशावेळी बाचाबाची होतानाचे प्रकारही दिसत आहेत. रणरणत्या उन्हात कामधंदे सोडून सर्व जण रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत. कधी आपला नंबर येतो आणि पेट्रोल टाकून कधी जातो, असं या लोकांना झालेलं आहे.

ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याच्या अफवांमुळे वाहनधारक जास्तीत जास्त पेट्रोल डिझेल भरताना दिसत आहेत. तर पेट्रोल पंप चालकांनी ड्रममध्ये पेट्रोल, डिझेल देणे बंद केल्याने अनेकांची गोची झाली आहे.

तर चक्काजाम करू

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर-जालना रस्त्यावरील गो गॅसपंपा समोर ऑटो रिक्षा चालकांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. सकाळी पाच वाजल्यापासूनच ऑटो रिक्षा चालक पंपावर गॅसच्या प्रतीक्षेत रांगेत उभे असलेले दिसत आहेत. ऑटो एलपीजी गॅस मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या ऑटो चालकांनी रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने फायनान्सवर आलेल्या ऑटो चालकांचे दोन हप्ते माफ करण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर 30 तारखेला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ऑटो रिक्षा संघटनेने दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांच्या ऐशीतैशी

बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणवरील पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डिझेलही घेऊन गेला असल्याचा प्रकार घडला आहे. तर इतर ही ग्राहक पंपावर मिळेल ते प्लास्टिक डब्बे घेऊन रांगेत लागलेले दिसले. दुसरीकडे मात्र जिल्हाधिकारी यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.

आले तसे गेले

सलग तिसऱ्या दिवशी जालना जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळेल या आशेपोटी बदनापूरच्या पेट्रोल पंपावर नागरिक दाखल झाले होते. मात्र स्टॉक नसल्याने त्यांच्यावर माघारी फिरण्याची वेळ आली. बदनापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातून नागरिक दुचाकी आणि चार चाकी वाहन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल झाले होते. स्टॉक नसल्यामुळे पेट्रोल पंप चालकांना पंपावर बॅरेकेटिंग करावी लागली आहे.

 

Follow Us