
राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारत मोर्चा काढण्याची घोषणा केली. येत्या ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेची युतीच्या दिशेने सकारात्मक पावलं पडताना दिसत आहेत. यामुळे सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधातील मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र सहभागी होणार असल्याची माहिती मिळताच टीव्ही ९ मराठीने त्यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना याबद्दलची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. मी मामा म्हणून फक्त ते दोघे जण एकत्र येण्याचे स्वप्न बघत होतो आणि ते लवकरच पूर्ण होईल, असे चंद्रकांत वैद्य म्हणाले.
“हा प्रश्न तुम्ही त्या दोघांनाच विचारलेला बरा आहे. आजच्या घडीला मराठी माणसासाठी आणि मराठीच्या मुद्द्यावर ते दोघे एकत्र येतात, हीच एक चांगली घटना आहे. त्या दृष्टीने सकारात्मक पावलं पडतात हे एक देवाच्या कृपेने महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी चांगली घटना आहे. मी बोलणी करणार कोणीही नाही. त्यांचे नेते आणि ह्यांचे नेते असतात, त्यांच्या बोलणी होतात. मी मामा म्हणून फक्त ते दोघे जण एकत्र येण्याचे स्वप्न बघत होतो आणि ते लवकरच पूर्ण होईल, अशी मला पूर्ण खात्री आहे. आज ते दोघेही एक एक पाऊल पुढे आलेले आहेत, पुढे एक एक हात पुढे येऊन एकत्र येतील असं मला वाटतं”, असे चंद्रकांत वैद्य यांनी सांगितले.
“सल्ला देण्याएवढं ते दोघेही लहान नाहीत. ते मॅच्युअर आहेत. सल्ला देण्यापेक्षा त्या दोघांना चांगली जाण आहे. यापुढची पावलं नक्कीच सकारात्मक असतील, अशी आपण तुळजाभवानी चरणी प्रार्थना करुया. ती नक्कीच या गोष्टीला यश देतील. मी एक मामा म्हणून एवढंच सांगेन की वेळ आणि तारखेबद्दल दोघांना सहमती मिळाली, ही एक शुभ गोष्ट आहे. यामुळे चांगली गोष्ट घडण्याची वेळ जवळ आलीय, असं वाटतंय. चित्र किती बदलेल आणि किती नाही हे मी आताच सांगू शकत नाही. मी राजकीय अभ्यासक नाही. पण एकच आहे की मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून सर्वांना बळ मिळेल. मराठी माणसाला जोर येईल. आपल्या मागे कोणीतरी उभं राहिलंय, याची एक मनोमन खात्री होईल. त्यानंतर नक्कीच मराठी माणसाला बळ मिळेल”, असेही त्यांनी म्हटले.
“एक मराठी माणूस म्हणून मी नक्कीच एकत्र येईल. मामा म्हणून ते एकत्र आलेले पाहताना मला नक्कीच आनंद होईल. आदित्य आणि अमित अजून लहान आहेत. त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतलाय. तेही या गोष्टीला सकारात्मक दृष्टीकोनातून बघतील”, असेही चंद्रकांत वैद्य यांनी सांगितले.