
राज्यात सध्या मराठीच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच पेटलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला मराठी न बोलण्याच्या मुद्यावरून मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून मनसेवर प्रचंड टीका करण्यात आली. याच मुद्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. वरळी डोममध्ये मनसे शिवसेनेच्या विजयी मेळाव्यात बोलताना त्यांनी या मुद्यावरून थेट सुनावलं. ‘ऊठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
काय म्हणाले राज ठाकरे ?
काल एका व्यापाऱ्याच्या कानफडात मारली. त्याच्या माथ्यावर गुजराती असं लिहिलं होतं का ? इतर हिंदी आणि वेगळ्या चॅनलमध्ये चालवलं की गुजराती माणसाला मारलं. बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. गुजरात्याला मारलं का. किती व्यापारी आहे. अजून तर काहीच केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले.
त्यांना मराठी आली पाहिजे. यात वाद नाही, ऊठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले. पण चूक त्यांची असली पाहिजे. अशी कधी गोष्ट कराल तर त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगणारा नसतो. मार खाणारा सांगतो. मला मारलं. त्यांना सांगू देत. पण ऊठसूट कुणाला मारू नका असं राज ठाकरेंनी सुनावलं.
माझ्या परिचयाचे अनेक लोक आहेत. माझा मित्र आहे, नयन शाह. मी त्याला गुजराठी म्हणतो. तो अप्रितम मराठी बोलतो. पण विनोदाचं अंग आहे. शिवाजी पार्कात हेडफोन लावून पुलं देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं हे बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं.
सावध रहा, सतर्क रहा
यावर सावध राहा, सतर्क राहा. पुढे काही गोष्टी घडतील माहीत नाही. पण मराठीसाठीची एकजूट कायम राहावी. महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो असं राज ठाकरे म्हणाले.