धनंजय मुंडेंना तब्बल 42 लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सातपुडा सरकारी बंगला रिकामा केलेला नाही. त्यामुळे त्यांना ४२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना हाच बंगला वाटप झाला असून, मुंडे यांना मुदतवाढ मागितली आहे, असे ते म्हणतात. सरकारी यंत्रणेतील उदासीनता आणि या प्रकरणातील विरोधाभासाबाबत चर्चा रंगली आहे.

धनंजय मुंडेंना तब्बल 42 लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
dhananjay munde
| Updated on: Aug 04, 2025 | 11:07 AM

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्याने तत्कालीन अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन काही महिने उलटले आहेत. तरी त्यांनी मलबार हिल येथील सातपुडा हा शासकीय बंगला अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे त्यांना आतापर्यंत तब्बल ४२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ या बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला वाटप करण्यात आला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत सरकारी बंगला रिकामा करणे बंधनकारक असते. धनंजय मुंडे यांनी ४ मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार त्यांनी २० मार्चपर्यंत बंगला सोडणे अपेक्षित होते. पण त्यांनी मुदतवाढ मागून अद्याप बंगला रिकामा केलेला नाही.

त्यातच दुसरीकडे २० मे रोजी छगन भुजबळ यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्याचा शासकीय आदेश २३ मे रोजी काढण्यात आला. पण अद्याप धनंजय मुंडे यांना बंगला रिकामी करण्याची कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही. यावर सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

तसेच ‘सातपुडा’ बंगल्याचे क्षेत्रफळ ४ हजार ६६७ चौ. फूट आहे. नियमांनुसार, मंत्र्यांनी १५ दिवसांत बंगला सोडला नाही, तर त्यांना प्रति चौ. फूट २०० रुपये दंड आकारला जातो. यामुळे, मुंडे यांना महिन्याला ९ लाख ३३ हजार रुपये दंड लागत असून, आता ही रक्कम ४२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांनी नुकतंच प्रतिक्रिया दिली आहे. आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे. याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे” असे धनंजय मुंडे म्हणाले.