रम, रमी, रमणी आणि हनी ट्रॅपच्या भानगडीत राज्य सरकारचा कोठा; सामनाचा हल्लाबोल

सामनाने महाराष्ट्रातील भाजप सरकारवर तीव्र टीका केली आहे. अनेक मंत्र्यांवर रमी खेळणे, लाचखोरी आणि हनीट्रॅपमध्ये सापडण्याचे आरोप आहेत. या प्रकरणात अमित शहा यांनीही स्पष्ट सूचना दिल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकारातील काही मंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे

रम, रमी, रमणी आणि हनी ट्रॅपच्या भानगडीत राज्य सरकारचा कोठा; सामनाचा हल्लाबोल
sanjay raut devendra fadnavis
| Updated on: Jul 22, 2025 | 8:02 AM

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करीत सिगारेट फुंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय, चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय. ‘रम, रमी, रमणी’च्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या कथित गैरवर्तनावर आणि त्यांच्या नैतिकतेवर अग्रलेखात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

अमित शाहांकडून स्पष्ट सूचना

फडणवीसांचे सरकार हे कडवट हिंदुत्ववादी वगैरे आहे असे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेवर येण्याआधी त्यांनी पंचांग पाहून मुहूर्त काढला असेलच. सरकारातील काही जणांनी तर आसामच्या कामाख्या मंदिरात अघोरी पूजा करून सत्तेत प्रवेश केला, पण या सगळ्यांचा मुहूर्त चुकलेला दिसतो. मंत्र्यांचे उपद्व्याप आणि प्रताप ज्या पद्धतीने समोर येत आहेत ते पाहता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील व पाच ते सहा मंत्र्यांना लाथ मारून घरी बसवावे लागेल. राजकीय वर्तुळात अशा मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. संजय शिरसाट, योगेश कदम, माणिक कोकाटे, दादा भुसे, संजय राठोड व नाशिकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या पाच मंत्र्यांपैकी काहींना जावे लागेल. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असा गौप्यस्फोटही सामनातून करण्यात आला.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रम, रमा, रमणीचा खेळ सुरू

सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जो ‘रम, रमा, रमणी’चा खेळ सुरू आहे, त्यात भाजपचे मंत्रीही नक्कीच आहेत. गिरीश महाजन यांचा खास प्रफुल लोढा याच्यावर ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याचा उल्लेख आहे. मुंबई (साकीनाका, अंधेरी पोलीस स्टेशन), नाशिक, जामनेर येथे पोलिसांनी गुन्हे दाखल करून लोढाच्या घरावर धाडी घातल्या. त्यांच्याकडील सीडी, पेनड्राईव्ह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांची रहस्ये दडलेली आहेत, असा दावा अग्रलेखात केला आहे.

लोढाच्या घरावर पोलीस धाडी का घालतात?

लोढाने गिरीश महाजन आणि त्यांच्या लोकांपासून आपल्या जीवितास धोका असल्याचे निवेदन दिल्याचाही उल्लेख आहे. फडणवीस आणि महाजन यांनी लोढाचा सत्कार केला होता, त्यामुळे लोढा हनी ट्रॅपचा सूत्रधार असला तरी, हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष महाजन आणि इतर लोकच असल्याचा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे. फडणवीस यांनी विधानसभेत हनी ट्रॅपचा विषय उडवून लावला असला, तरी मग प्रफुल्ल लोढाला जीवे मारण्याच्या धमक्या कोणता मंत्री देत आहे. लोढाच्या घरावर पोलीस धाडी का घालत आहेत, असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.