आजपासून महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात, कोण कोण अर्ज भरणार? तुमच्या प्रभागातील स्थिती काय ?

मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्यास आज सुरूवात होत असून अंतिम मुदत 30 डिसेंबर आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती-जागावाटपावर खलबतं सुरू आहेत.

आजपासून महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात, कोण कोण अर्ज भरणार? तुमच्या प्रभागातील स्थिती काय ?
महापालिकेच्या रणसंग्रामाला आजपासून सुरुवात
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 23, 2025 | 9:09 AM

मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची (Maharashtra Municipal Corporation Election 2026) गेल्या आठवड्यात घोषणा झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या रणसंग्रमाला सुरुवात झालेली असून विविध भागांतील उच्छुक उमेदवार आजपासून अर्ज दाखल करण्यासाठी जय्यत तयारीत आहेत. पण अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांची आघआडी किंवा युती याबाबत अद्याप घोषणा न झाल्याने स्पष्टता नसून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी किती उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतात, हे पाहणंही महत्वाचं ठरेल.

नागपूरम महानगरपालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांना 30 डिसेंबर पर्यंत महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. महानगरपालिकेच्या दहा झोन कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून शहरातील 38 प्रभाग 10 झोन मध्ये विभागण्यात आले आहेत. झोनमध्ये येत असलेल्या संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

पुण्यातही उमेदवारांचे अर्ज आजपासून स्वीकारणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे जागावाटप उमेदवार निश्चित करणे यावर खलबतं सुरू असताना आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची ही मुदत 30 डिसेंबर पर्यंत असणार आहे. महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भाजपची पहिली यादी शुक्रवारी

महानगरपालिकेसाठी मुंबई सोडून इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याचा भाजपचा मनसुबा असून शुक्रवारी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर होणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार अंतिम करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्यामध्ये उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे . ही यादी किमान 80 उमेदवारांची असेल असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची सावध भूमिका 

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा सुरू असलेल्या चर्चेवरून आता सावध भूमिका घेतली आहे. योग्य न्याय मिळणार असेल तर सहभागी होण्याची सूचना देण्यात आली आहे. जागा वाटपात योग्य न्याय मिळत असेल तर सामील व्हा, अन्यथा महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर राहण्याची भूमिका घ्या अशा सूचना प्रदेश काँग्रेसकडून शहर पातळीवर देण्यात आल्या आहे, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अजित दादांचा 3 दिवसांपासून पुण्यात मुक्काम

दरम्याम उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या तीन दिवसापासून पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची जोरदार तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड च्या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर, गेल्या दोन दिवसापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांच्या पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. आज देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील इच्छुक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये गाठीभेटी घेत आहेत.

पिंपरीत भाजप-शिंदे युतीवर शिक्कामोर्तब, श्रीरंग बारणेंचा दावा!

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब मोर्तब झालंय. पुढच्या काही तासांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, याची घोषणा केली जाणार आहे असा दावा शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणेंनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाने हा निर्णय होतोय. या युतीत आम्ही तीस जागांची मागणी केलीआहे, मात्र यात तडजोड होईल, कोणतीही रस्सीखेच केली जाणार नाही असंही बारणेंनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप पेक्षा अधिकच्या जागांची ऑफर दिली तरी ती आम्ही स्वीकारणार नाही. शिवसेनेची भाजप सोबत असणारी पारंपरिक युती पिंपरी पालिकेत कायम ठेवण्याचा आम्ही अंतिम निर्णय केलाय. फक्त आता घोषणेची औपचारिकता बाकी आहे असाही दावा बारणेंनी केला आहे.