
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भाजपसोबत युतीत असतानाच शिवसेना चांगली कामगिरी करते, हा समज मोडीत काढत शिवसेनेने स्वबळावर लढून मोठा स्ट्राइक रेट नोंदवला आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र जितक्या जागा मिळाल्या नाहीत, त्यापेक्षा जास्त जागांवर शिवसेनेने विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
शिवसेनेने आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सुमारे १३५ जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी ५० हून अधिक नगराध्यक्षपदे पटकावली आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत शिंदे यांच्या शिवसेनेने पाच पट अधिक यश मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना एकत्रितपणे जितक्या जागा मिळाल्या नाहीत. त्यापेक्षा अधिक जागा एकट्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवारांना पराभूत करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोकणात मंत्री रवींद्र चव्हाण आणि डहाणू-पालघरमध्ये गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या प्रभावाखालील क्षेत्रांत शिवसेनेने मुसंडी मारली. कणकवली आणि मालवण या दोन्ही प्रतिष्ठेच्या ठिकाणी शिवसेनेने विजय मिळवला आहे.
सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकट्याने लढत देत विरोधकांचा क्लीन स्वीप केला आहे. महाडमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भगवा फडकवला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाला आणि विशेषतः राज्याचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा राजकीय फटका बसला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या नगरपालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. मूल नगरपरिषदेत एकूण २० जागांपैकी तब्बल १८ जागांवर विजय मिळवून काँग्रेसच्या एकता समर्थ नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले असून, या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बीडच्या गेवराई नगरपरिषदेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का बसला आहे. येथे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजय गीता पवार (भाजप) यांनी विजय संपादन केला आहे. लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाची गेल्या १५ वर्षांपासून गेवराईवर सत्ता असून ती कायम राखण्यात त्यांना यश आले आहे. या विजयामुळे बीडमधील भाजपची ताकद अधोरेखित झाली आहे.
नाशिकच्या सटाणा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेच्या हर्षदा पाटील आणि त्यांचे पती राहुल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे व त्यांच्या पत्नीचा पराभव केला. हा विजय पालकमंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठे यश मानले जात आहे. तर भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या वर्चस्वाला यामुळे तडा गेला आहे.