Maharashtra News LIVE : बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात
Maharashtra News LIVE Updates : ज्ञान, समता आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ असलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक संपुष्टात येत असताना कांद्याचे दर घसरले
तीन एप्रिलच्या तुलनेत आज 14 एप्रिल रोजी तीनशे रुपयांची घसरण झाली आहे. लाल कांद्याला सरासरी फक्त 700 रुपये दर आहे. उन्हाळी कांद्याला सरासरी 1200 रुपये दर आहे. सकाळच्या सत्रात एकूण 400 वाहनांतून लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. वाहतूक व मजुरी खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट आलं.
-
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, अनिल बोंडे आणि यशोमती ठाकूर एकाच मंचावर…
अमरावती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर एकाच मंचावर उपस्थित आहेत. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात भाजप खासदार अनिल बोंडे आणि काँग्रेस नेत्या यंशोमती ठाकूर यांच्यात राजकीय वैर आहे. दोन्ही नेते सातत्याने अनेकदा एकमेकांवर टीका करत असतात. मात्र आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले..
-
-
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा मोठा दावा, भोंदू अशोक खरातचा हे लोक एन्काऊंटर करतील
2023 ला महिला विधेयक मंजूर करण्यात आले मात्र मोदी सरकारने त्याच्या अंमलबजावणीसाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावलं. मुळात जनगणना न करता हे पन्नास टक्के महिला आरक्षण विधेयक आणत आहेत. राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे. मी देखील कोणत्याही जयंतीसाठी वर्गणी देत नाही. महापुरुषांच्या विचाराच्या अनुषंगाने जे उपक्रम राबवतात त्यासाठी मी मदत करते. बाबासाहेबांच्या संविधानाची देशाला आज नितांत गरज आहे. स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी अनेक सत्तेतल्या लोकांचे माहिती समोर येईल. त्यामुळे त्यांचा एन्काऊंटर होऊ शकतो… असा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
-
सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फुटी पुतळ्याचे दिमाखात लोकार्पण
सांगली शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. एसटी स्टँड परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या महामानवाच्या भव्य १४ फुटी पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी हजारो आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने संपूर्ण सांगली शहर दुमदुमून गेले होते.
-
परळीत धनंजय मुंडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज परळी येथे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आज प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती आणि जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले असल्याचे अधोरेखित केले. संविधानाकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत, लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे हीच आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे मुंडे यांनी म्हटले. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.
-
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कवी संमेलनात काव्यरचना सादर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापूर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कवींनी आपल्या कवितांमधून महामानवाला अभिवादन केले. या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ कवी संभाजी जौंजट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक जीवनातील संघर्षावर आणि त्यांच्या यशावर आधारित हृदयस्पर्शी कविता सादर केली. महामानवाच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांना त्यांनी आपल्या शब्दांतून उजाळा दिला, ज्याला उपस्थित श्रोत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
-
भंडाऱ्याच्या बेला गावाजवळ भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत 1 ठार, 4 जखमी
भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बेला गावाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
-
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थकारणाला दिशा दिली – मुख्यमंत्री फडणवीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थकारणाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद, धर्मभेद दूर केले. बाबासाहेबांमुळे देशाने गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं. महिला पुरुष भेद संपवण्याचे काम देखील केले. एक व्यक्ती किती मोठ परिवर्तन घडवू शकतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
-
ठाणे महापालिकेचे मोठे पाऊल, शहरात 19 ठिकाणी उभारणार ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स
पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरात १९ ठिकाणी ई-वाहन (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास हिरवा कंदील दिला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या पुढाकारामुळे ठाणे शहरात ई-वाहनांच्या वापराला चालना मिळणार आहे. शाश्वत आणि हरित वाहतुकीच्या दिशेने महापालिकेचे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
-
आमदार संतोष बांगर यांचा मंत्र्यांना घरचा आहेर..
नांदेडमधील पदाधिकारी मेळाव्यात आमदार संतोष बांगर भडकले. त्यांनी फोन न उचलणाऱ्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. यावेळी श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम अनुयायी अभिवादनासाठी दाखल
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो अनुयायी यायला सुरुवात. यंदाच्या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासमोर सेल्फी पॉईंट लावण्यात आलीय.झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देणारी सेल्फी पॉईंटसोबत अनेकजण फोटो काढताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेतेदेखील अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत.
-
13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; सावत्र पित्याला अटक
केज तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीची आई माहेरी गेलेली असताना, घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन नराधम पित्याने हे कृत्य केले. लहान मुलाला मोबाईलमध्ये गुंतवून ठेवून त्याने मुलीवर बळजबरी केली. आई घरी परतल्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
-
माजलगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘समता ज्योत रॅली’ संपन्न
बीडच्या माजलगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आज ‘समता ज्योत रॅली’ संपन्न झाली. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या विचारांचा जागर करण्याचा उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राजकीय नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी या समता ज्योत रॅलीलीमध्ये सहभागी झाले होते.
-
त्रंबकेश्वर देवस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक
दर्शन काळाबाजार प्रकरणी थेट विश्वस्तांचा सहभाग असल्याची पोलिसांना माहिती. दर्शनासाठी येणाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा. पुरुषोत्तम कडला के त्रंबकेश्वर देवस्थान चे विश्वस्त. भाविकांना मारहाण, दर्शनासाठी पैसे उकळण्याचा होत्या तक्रारी. अध्यक्षांकडून सुरू होती चौकशी
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांची पोस्ट
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. त्या वर्गाला प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत राहील, अशी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लिहिली आहे.
-
नाशिकचे पोलीस IG दत्ता कराळे यांच्या चौकशीची अंजली दमानिया यांची मागणी
नाशिक- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून नाशिक पोलीस आयजी दत्ता कराळे यांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यक्रमात IG दत्ता कराळे का गेले असा सवाल त्यांनी केला. खरातच्या कार्यक्रमात IG दत्ता कराळे यांनी भाषण देखील केल्याचा दमानिया यांचा दावा आहे. दत्ता कराळे आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यात 18 कॉल असल्याचा अंजली दमानिया यांचा दावा आहे. नाशिकचे पोलीस IG दत्ता कराळे यांच्या चौकशीची अंजली दमानिया यांनी मागणी केली आहे.
-
तलाक बैठकीतील झालेल्या वादानंतर संतप्त सासरच्या मंडळींचा सून, मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
तलाक बैठकीतील झालेल्या वादानंतर संतप्त सासरच्या मंडळींनी सून आणि मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. पोलीस ठाण्याच्या बाहेर भररस्त्यात चाकू आणि दगडफेक करत हा जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
गोरेगावमध्ये आयोजित एका हाय-प्रोफाईल लाईव्ह कॉन्सर्ट पार्टीमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबईतील गोरेगावमध्ये आयोजित एका हाय-प्रोफाईल लाईव्ह कॉन्सर्ट पार्टीमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एका मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ११ एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. या कॉन्सर्टला आलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्ज घेतलं होतं आणि ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली असा संशय आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी एफआयआर दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे.
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती; अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती आहे. बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल होत आहेत. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेनं छायाचित्रांचं प्रदर्शन लावलं आहे. यामध्ये बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरतील पत्र व्यवहार असेल, त्यांच्या पदवी मधील काही फोटो असतील किंवा काही दुर्मिळ फोटो असतील याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे.
-
मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी
मुंबई-नाशिक महामार्गावर चार चाकी वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रेलर ट्रकला मागून धडकल्याने अपघात झाला आहे. अपघाताची पहाटे चार वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे माहिती प्राप्त झाली. वाहनचालक दीपक पटेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असून यातील तीन पुरुष एक महिला यांच्यावर खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
-
नाशिकमधील बड्या कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी
नाशिकमधील बड्या कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. २०२२ पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय आहे. महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाची तपासणी तीव्र झाली आहे. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती/संघटनांकडून फंडिंग होते का, याचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. काही महिलांना मानसिक दबावाखाली ठेवून हालचाली केल्याचा संशय आहे. ई-मेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, धमक्या यांची तपासणी सुरू आहे. टीसीएसने अंतर्गत चौकशीसाठी आरती सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती आहे. बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेनं छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केलं आहे. यामध्ये बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरतील पत्र व्यवहार असेल, त्यांच्या पदवीमधील काही फोटो असतील किंवा काही दुर्मिळ फोटो असतील याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. तर कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे. 448 कलमांचा वापर करत संविधानाच्या कलमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली. ही कलाकृती समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देत असून कलमांनी रेखाटलेल्या या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा होत आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Apr 14,2026 8:09 AM
