Maharashtra News LIVE : अयोध्या: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली
Maharashtra live update : मोशीत घडलेल्या दुर्घनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज बचावकार्य थांबवण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोशीत कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मोशीत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. मागील दोन दिवसांत राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील दारणा, भावली, भाम, वाकी, वालदेवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर कळंब येथे या पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे संपूर्ण कळंब शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
-
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथे मुक्कामी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथे मुक्कामी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. सकाळपासून भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. सासवडमध्ये सध्या भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.
-
-
आषाढीला पंढरपूर वारीसाठी 40 वारकरी एकत्र आले तर विशेष बसची सेवा
आषाढीला पंढरपूर वारीसाठी 40 वारकरी एकत्र आले तर विशेष बसची सेवा देण्यात येईल. एसटी महामंडळाने तशी योजना आणली आहे. आषाढीसाठी पंढरपुरात चार बसस्थानके , 5500 बसेस आणि 11 हजार कर्मचारी असतील.
-
पक्षाच्या बॅनरवर सुनेत्रा पवार, अजितदादांचाच फोटो असेल- अनिल पाटील
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये बॅनरवर केवळ सुनेत्रा पवार व अजित दादा यांचा फोटो असेल. ही पक्षाची ठाम भूमिका आहे. असे अनिल पाटील यांनी सांगितले आहे.
-
परभणीच्या मानवतमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात वाद
परभणीच्या मानवतमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात वाद
वादानंतर नगरसेवकासह त्यांच्या भावाला रॉड आणि चाकूने मारहाण
मारहानीचा cctv आला समोर, घटनेमुळे मोठी खळबळ
घटनेत नगरसेवक विक्रमसिंह दहे आणि भाऊ अभयसिंह दहे गंभीर जखमी झाल्याची माहिती.
-
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमध्ये दाखल
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमध्ये दाखल
श्री संत तुकाराम पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी यवत येथे भाविकांची मोठी गर्दी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या सकाळी होणार वरवंडच्या दिशेने रवाना
उद्या पालखी सोहळा वरवंड येथे असणार मुक्कामी
.
-
मोशी कचरा डेपो प्रकरण, सुषमा अंधारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल
मोशी येथे कचऱ्याचा ढिग कोसळून मोठी दूर्घटना घडली, या घटनेमध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागला. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या आहेत, मोशी कचरा डेपो चालविणाऱ्या ALR कंपनीच्या ठेकदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे.
-
नेरूळ स्टेशन परिसराला अवैध फेरीवाले आणि तडीपारांचा विळखा; थेट पोलिसांवरच हल्ला!
नेरूळ पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना भरदिवसा घडली आहे. स्टेशनच्या वर्दळीच्या ठिकाणी एका माथेफिरूने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या थरारामुळे परिसरात काही काळ प्रचंड घबराट आणि गोंधळ निर्माण झाला होता.
-
विनायक राऊतांसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल
विनायक राऊतांसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल… जादूटोणा केल्याचे सून गिरीजा राऊत यांचे आरोप… भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी
-
वाघोलीसाठी 91 कोटी रुपयांच्या उच्च दाब केंद्राच्या प्रस्तावाला गती
वाघोलीसाठी 91 कोटी रुपयांच्या उच्च दाब केंद्राच्या प्रस्तावाला गती… रांजणगाव एमआयडीसी आणि सणसवाडीतील वीज समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय….यामुळे नागरिक आणि उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार… आमदार माऊली आबा कटके यांच्या पाठपुराव्याला यश….
-
धरणसाठ्यात वाढ झाल्याने पुणे शहरातील पाणी कपात तात्पुरती स्थगित
धरणसाठ्यात वाढ झाल्याने पुणे शहरातील पाणी कपात तात्पुरती स्थगित….सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार… दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार… पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा…
-
पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमधील दुर्घटनेनंतर कचरा डेपो बंद
पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमधील दुर्घटनेनंतर कचरा डेपो बंद…शहरातील कचरा या डेपोमध्ये टाकला जात नसल्याने सोसायटी आणि घरामधून कचरा संकलन बंद करण्यात आलं आहे…
-
खासदार बळवंत वानखडे यांच्यावर माजी खासदार नवनीत राणा यांची टीका
काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे. मी कधी शासकीय कार्यक्रमात मंचावर जात नसते. मी माजी खासदार झाल्यामुळे मनाला नेहमी वेदना असतात. शेरनी अगर शांत है तो डकारणा कभी छोडती नही…हे लक्षात ठेवा -नवनीत राणा यांचं खासदार बळवंत वानखडे यांना आव्हान आहे. जे निवडून आले त्यांना मी नेहमी शुभेच्छा दिल्या आहे ,महिला बद्दल बोलत असताना मर्यादा असल्या पाहिजे मी माझी मर्यादा केव्हा विसरत नाही .मी माझ्या विचारांची पक्की आहे. माझी विचारधारा मी सोडणार नाही दुसऱ्याच्या दारात मी खासदारकीसाठी गेली नाही
-
लवकरच 26 आमदार शिवसेना शिंदे गटात येणार – राजकुमार हिवरकर
सचिन आहेर पक्षात येणे हा पहिला टप्पा होता लवकरच 26 आमदार शिवसेना शिंदे गटात येणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर यांचे मोठे विधान आहे. सोलापुरातील एका पक्षाच्या कार्यक्रमात राजकुमार हिवरकर यांनी हा गौप्यस्फोट केलाय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक समाजाचे नेते पक्षात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखी पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
-
बीड तालुक्यातील बालाघाटावरील 11 शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे सोयाबीन उगवलं नसल्याने तक्रार
बीड तालुक्यातील बालाघाटावरील 11 शेतऱ्यांनी सोयाबीन न उगवल्याने कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर कृषी विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी करून पंचनामे तयार केले आहेत. मच्छिंद्र दराडे या शेतकऱ्याच्या मोरगाव येथील चार सोयाबीनच्या बॅग न उगवल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. तर नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी फोनवरून बोलताना सांगितले की आम्ही पंचनामे केले असून शेतकऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
राऊतांना अटक करावी
मुलगी माहेरी आल्यापासून आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत आहोत. आपला मुलगा काय करतो हे त्यांना माहित आहे. राऊत यांचा मुलगा घाणेरड्या शिव्या देतो. मानसिक त्रास देतो आम्ही ३ वर्ष गाठीभेटीसाठी वेळ मागत होतो. त्यांनी केलेले आरोप आम्ही फेटाळत आहोत. आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला. या सर्व अंधश्रद्धा प्रकरणात विनायक राऊत सहभागी आहेत. पैशा्ची मागणी चुकीची आहे. आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही ३ वर्ष थांबलो नसतो. राजकिय पातळी त्यांची चांगली असल्याने आम्ही काही बोललो नाही. आम्हाला फक्त मुलगी चांगली संसारी राहतो ही इच्छा. आम्ही राऊतंचाही अटकेची मागणी करत आहोत, अशी मागणी गिरिजा राऊत यांच्या आईने केली आहे.
-
अवैधरित्या जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारे 3 शेड पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त
जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून मागच्या काही दिवसापासून बेकायदेशीर रित्या असलेल्या अतिक्रमणावर कारवाईचा धडाका सुरूच आहे, शहरालगत असलेल्या चंदनझीरा परिसरात अवैधरीत्या जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरले जाणारे 3 पत्रांचे शेड, पाण्याचा हौद आदी अनाधिकृत बांधकामे पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केले.महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
-
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री- प्रफुल्ल पटेल
देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे होणार नाही तर बावनकुळे होतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावर प्रफुल पटेल यांनी “देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्यात शेतकरी, गोरगरीब, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा (रस्ते) अशा अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत उल्लेखनीय विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावे, ही सर्वांचीच इच्छा आहे,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले आहे.
-
आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही तीन वर्षे थांबलो नसतो- गिरीजा राऊतची आई
“मुळात आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत होतो. विनायक राऊत यांना मुलगी आहे, आरोप करताना विचार करावा. मुलगी माहेरी आल्यापासून आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत आहोत. आपला मुलगा काय करतो हे त्यांना माहीत आहे. राऊत यांचा मुलगा घाणेरड्या शिव्या देतो, मानसिक त्रास देतो. आम्ही तीन वर्षे गाठीभेटीसाठी वेळ मागत होतो. त्यांनी केलेले आरोप आम्ही फेटाळत आहोत. आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला. या सर्व अंधश्रद्धा प्रकरणात विनायक राऊत सहभागी आहेत. आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही तीन वर्षे थांबलो नसतो,” अशी बाजू गिरीजा राऊत यांच्या आईने मांडली.
-
गरिबाला रोटी कापड मकान हवं असतं-नितीन गडकरी
सफाई कर्मचाऱ्यांसाठी घर बनविण्याचा योजनेची सुरवात झाली त्यासाठी महापालिकेचे अभिनंदन करतो. या योजनेला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली त्यासाठी त्याच स्वागत करतो. गरिबाला रोटी कापड मकान हवं असत ते त्याला मिळालं की आनंद होतो. वाल्मिकी समाजात विद्यार्थी आता शिक्षण घेत आहे ते इंजिनिअर बनत आहे हे चांगलं चित्र आहे. सफाई कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी मी अनेक प्रयत्न केली मात्र राज्यात सरकार येताच अनेक योजना सुरू केली आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.
-
नांदेडच्या विष्णुपुरी इथल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची NHAI कडून पाहणी
नांदेडच्या विष्णुपुरी येथील राष्ट्रीय महामार्गांवरील पूलाचा भाग कोसळल्या नंतर आज NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सदस्यांनी पुलाची पाहणी केली. हे पथक दिल्लीवरून आले होते. या पथकात पाच सदस्य असून पथकाने प्रत्यक्ष पुलावर आणि पुलाच्या खाली जाऊन पाहणी केली. पुलाचा भाग खाली दबला असल्याचा आणि पुलाचं पाणी पुलात मुरत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं.
-
विनायक राऊत यांच्या सुनेच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
“विनायक राऊत यांच्यासंदर्भात अशा प्रकारच्या कृती ऐकण्यात येत होत्या. पण आता घरातच ते अशा प्रकारे आपल्या सुनेलाच त्या ठिकाणी अशा गोष्टींना भाग पाडत असतील तर यापेक्षा दुर्दैव दुसरं असू शकत नाही. हे केवळ घरातून आलेलं एक प्रकरण आहे, अशा प्रकारच्या गोष्टी याच्यापुढे येतीलच. अशा प्रकारची गोष्टी जे जे बाबा करतील त्याला माफ करता कामा नये,” अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
-
विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर 7 जणांविरोधात गुन्हा
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात आरोपींपैकी दोन भोंदू बाबा असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. भोंदूबाबा फिरोज शेखला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरा भोंदूबाबा काझीच्या शोधासाठी पोलिसांची दोन विशेष पथके तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
तुळजाभवानी मंदिरात 281 ग्रॅमचं सोन्याचं मंगळसूत्र अर्पण
तुळजापूर इथळ्या तुळजाभवानी मंदिरात आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथल्या श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते विधिवत अभिषेक, पूजा-अर्चा आणि ओटी भरण्यात आली. यावेळी संस्थानचे कुलमुखत्यार महेश कनकदंडे आणि मोहिनीताई कनकदंडे यांनी देवीला 281 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र भक्तिभावाने अर्पण केलं. अर्पण केलेल्या सोन्याची सुमारे 40 लाख 55 हजार एवढी किंमत आहे.
-
राजकीय समीकरम बदलण्याची चिन्ह- संजय शिरसाट
शरज पवारांकडून NDA चे कौतुक म्हणजे राजकीय समीकरण लवकरच बदलणार अशी चिन्हे दिसत आहेत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.
-
एकनाथ खडसे कोणत्याही पक्षात गेले तरी फरक पडणार नाही- गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
गुलावराव पाटील म्हणाले, “ज्या घरात तुम्ही राहिले काय झालं तिथे? आता काय आपला कार्यक्रम चांगला व्हावा मागच्यांची लाईन लागावी याचा करता हा प्रयत्न आहे.”
-
विनायक राऊतांच्या सूनेच्या आरोपानंतर फिरोज शेखला अटक
फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सावंतवाडी पोलिसाच्या मदतीने फिरोजला अटक
-
भिवंडीत धावत्या एसटी बसला अचानक भीषण आग
भिवंडी तालुक्यातील खडवली येथे धावत्या एसटी बसला अचानक आग लागून बस जळून खाक झाली.
-
“दुबई, थायलंडसह जगभर फिरलो, पण माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत”; राऊतांच्या सुनेचे पतीवर गंभीर आरोप
“दुबई, थायलंडसह जगभर फिरलो, पण माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत”; राऊतांच्या सुनेचे पतीवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यात तक्रार!
-
अलिबागमध्ये संतापजनक प्रकार
अलिबाग शहरातील एसटी स्थानकासमोर रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानकासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मात्र, पंचनामा पूर्ण झाल्यानंतरही तो जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी तब्बल तीन तास शववाहिका अथवा ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल नाईक यांनी केला आहे. -
संत सोपानदेव महाराज पालखीचे मुख्य मंदिरातून प्रस्थान….
संत सोपानदेव महाराज पालखीचे मुख्य मंदिरातुन प्रस्थान झाले आहे. टाळ मृदंगाच्या निनादत प्रस्थानाच्या भक्तीमय सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी केली.
-
जळगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची हाताने पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी धडपड…
जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात शेतकरी पीक वाचवण्यासाठी हाताने पाणी (चूहा) देत असल्याचे पाहायला मिळत आहे. उगवलेली कपाशी वाचवण्यासाठी शेतकरी हाताने लोट्याने तसेच साहित्य वापरून पाणी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली असून उगवलेले पीक कोमेजून जात असल्याचे दिसून येत आहे. निम्मा जुलै महिना उलटून सुद्धा पुरेसा पाऊस झाला नसल्याने उडीद आणि सोयाबीन बियाणे लावून जगलीच नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पुरेसा पाऊस नसल्याने दुबार पेरणीचा काळ देखील निघून गेल्याने खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-
मुंबईच्या दिशेने LNG गॅस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला तलासरी सावरोली उडान पुलाजवळ अपघात
मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात वाहिनीवरून मुंबईच्या दिशेने LNG गॅस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला तलासरी सावरोली उडान पुलाजवळ अपघात झाला आहे. अपघात वेळी टँकर चालक नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, रात्री 2 च्या सुमारास घटना घडली. घटनास्थळावर तलासरी पोलिसांसह वाहतूक पोलीस, दोन अग्निशमन दल दाखल आणि गुजरात गॅसचे कर्मचारी उपस्थित झाले. पलटी झालेल्या LNG गॅस टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकर मध्ये सुरक्षित खाली करण्याचे प्रयत्न सुरु असून किमान 5 ते 6 तास कालावधी जाणार.
-
पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली आहे. मुंबई-ठाण्याच्या पर्यटकांमुळे कोंडेश्वर हाऊसफुल्ल झाला आहे. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
-
ती तीन वर्षांपासून सोबत राहत नाही; विनायक राऊतांचा सूनेच्या आरोपांवर प्रतिक्रिया
कुटुंबीयावरील आरोप निखालस खोटे आहे. गितेश यांचं लग्न झाल्यावर त्यांच्या पत्नी तीन वर्षाासून सोबत राहत नाही. २०१८ ते २०२२पर्यंत अघोरी कृत्य केलं जात होते असं त्यांनी म्हटलंय. आईवडिलांना बाबा बुवाकडे घेऊन जाताना यायचे, असं ती म्हणते. आईबाबा सोबत होते. असे प्रकार होते तर तेव्हाच तक्रार का केली नाही असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
-
संत सोपानदेव महाराज पालखी प्रस्थान सोहळा
चांबळी नदीच्या काठावर वसलेल्या संत सोपानदेव महाराज मंदिरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. टाळ मृदंगाच्या निनादत वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आले आहे. संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा उत्साहात सुरुवात झाली आहे.
-
श्रीरामपूर शहर बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध
श्रीरामपूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद. शहरातील सर्वच आस्थापना पूर्णपणे बंद. बंदला व्यापारी वर्गाचा मोठा प्रतिसाद. गेल्या अकरा दिवसात प्राणघातक हल्ल्याच्या चार विविध घटना तर काल दुपारी भर दिवसा एका हॉटेल चालकाची हत्या. वाढत्या गुन्हेगारी विरोधात बंदची हाक…
-
घोडबंदर रोडवरील करपे कंपाउंड येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू
घोडबंदर रोडवरील करपे कंपाउंड येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. आज सकाळपासून दोन्ही बाजूंची वाहतूक १५-१५ मिनिटांच्या अंतराने सोडली जात असून, ठाण्याकडची वाहतूक चेना गावाकडून विरुद्ध दिशेने वळवण्यात आली आहे. मात्र, दुचाकीस्वारांच्या नियमभंगामुळे कामात अडथळा येत असल्याने प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
-
निसर्ग पंढरी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी
पावसाने जरी सध्या विश्रांती घेतली असली तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने भंडारदरा परिसराला अक्षरशः नवसंजीवनी दिली आहे. डोंगर-दऱ्यांतून कोसळणारे असंख्य छोटे-मोठे धबधबे, हिरवागार निसर्ग आणि धुक्याची दुलई… या सगळ्यामुळे भंडारदरा पुन्हा एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलय…
-
अयोध्येत सर्व ठेकेदार गुजरातचे- संजय राऊत
अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरण गाजत आहे. यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, अयोध्येतील काम करणारे सर्व ठेकेदार हे गुजरातचेच आहेत.
-
लाखो वैष्णवांचा मेळा ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोषणात निघाला पंढरीकडे…
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोर चा मुक्काम आटपून यवतकडे मार्गस्थ. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत येथे असणार आज मुक्कामी. लाखो वारकरी बांधव पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. पालखी सोहळ्यात वारकरी वर्गाचा वर्गाचा प्रचंड उत्साह …
-
ब्रेक घाटनांदुर येथे चाकूने वार करून 21 वर्षीय एकाचा खून रात्रीची घटना
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे वय 21 वर्षे या युवकाच्या रात्री घाटनांदुर येथे साठे चौकात चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. खुनाच कारण मात्र अजून समजू शकले नाही पोलिसांनी चार जणांना संशयत म्हणून ताब्यात घेतले आहे. मयताची बॉडी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आली आहे
-
सिडकोच्या घराची प्रतीक्षा पडली लांबणीवर
अनेक जण सिडकोच्या घराच्या सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु 4 महिन्यांपासून सिडकोची सोडत काढली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे मागील 4 महिन्यांपासून अडकले आहेत.
-
सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या ‘बूस्टर’ कंपनीविरोधात गुन्हा
सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या ‘बूस्टर’ कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोयाबीनचे 7 नमुने अप्रामानित ठरले आहे. तर 500 हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली. -
पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला लागली आग, दुर्घटनेत जीवितहानी नाही
पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला आग लागल्याची घटना घडली. आगीचे अद्याप कारण समजले नाही. पाच मजली इमारत असलेल्या भागात पहिला व दुसरा मजला दुकानाचा असल्याचे समजतेय. या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आयक्रॅलिक मशीन, कच्चे सामान, पीओपी, वायरिंग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
-
मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, मध्यरात्री एकाचा मृतदेह सापडला, शोधकार्य थांबवलं
मोशी दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा मृतदेह मध्यरात्री एक वाजता सापडला. बुधवारी दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू असलेलं बचावकार्य मध्यरात्री एक वाजता थांबवण्यात आलं. या ढिगाऱ्यात एकूण 23 जण अडकले होते.