Maharashtra News LIVE : अंबाजोगाई – बस-दुचाकीची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
मुंबईतील वाढते तापमान, आजच्या रेल्वे मेगाब्लॉकचे वेळापत्रक आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करता येणार आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्र, क्रीड, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

आज मुंबईकरांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे वाढत्या तापमानामुळे शहरात उष्णतेची लाट जाणवत आहे, तर दुसरीकडे रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे, ज्याचा मोठा फटका आज प्रवासाला निघणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. तर राजकीय वर्तुळात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज सकाळी बारामतीतील कन्हेरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून आपल्या प्रचार मोहिमेचा नारळ फोडतील. या प्रचार शुभारंभाला महायुतीचे दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आज मोठी राजकीय शक्तीप्रदर्शनाची शक्यता आहे. यांसह आजच्या दिवसभरातील सर्व ताज्या घडामोडींसाठी लाइव्ह ब्लॉग अपडेट्स नक्की पाहा
LIVE NEWS & UPDATES
-
पुणे : कोरेगाव भिमा परिसरात औद्योगिक कचऱ्याला भीषण आग
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा परिसरात औद्योगिक कचऱ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नरेश्वर वस्ती परिसरात एका खासगी कंपनीजवळ साठवण्यात आलेल्या औद्योगिक कचऱ्याने अचानक पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
-
नांदेड : कारखान्याकडे उसाचे 679 कोटी रुपये थकले
नांदेड विभागातील कारखान्याकडे उसाचे 679 कोटी रुपये थकले असून यामध्ये आमदार अमित देशमुख यांच्या नांदेड, परभणी आणि लातूर या तीन कारखान्याकडे 192 कोटी रुपयांची थकबाकी आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी ऊस उत्पादनाला पसंती देतात पण कारखाने ऊस वेळेत देत नाहीत आणि ऊस नेलाच तर वेळेत पैसे देत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊसाचे क्षेत्र कमी करू लागले आहेत.
-
-
जालना : काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांमध्ये बाचाबाची
जालन्यात काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांमध्ये बाचाबाची झाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ झाला. मी पक्ष निरीक्षकांना जाब विचारण्यासाठी गेले असता जिल्हाध्यक्षांनी मला बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नंदा पवार यांनी केला आहे. जालन्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची हकालपट्टी करण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
-
अंबाजोगाई – बस-दुचाकीची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लोखंडी सावरगावजवळ एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव शिवाई बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 20 वर्षीय अथर्व ढगे याचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
-
विहिरीत मृतावस्थेत आढळला वाघ
पाणी आणि शिकारीच्या शोधात जंगलातून गाव परिसरात आलेल्या एका वाघाचा तोंड नसलेल्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चोरखमारा परिसरातील सर्रा माल्ही इथे ही घटना घडली आहे.
-
परभणीत तापमान 41°C वर पोहचले
परभणीत तापमान 41°C वर पोहचले आहे. यावर्षीचे हे सगळ्यात उच्चांकी तापमान असल्याचे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने म्हटले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात तापमान 41 वर पोहचले आहे. मे महिन्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
..
-
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर पुन्हा आंदोलन – जरांगे पाटील
सरकारने शब्द दिला होता सर्व गुन्हे मागे घेतले जातील. जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सरकारने तसा शब्द दिलेला आहे. जर गुन्हे मागे घेतले नाही तर सर्वात मोठे आंदोलन उभे करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू असे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
आशा भोसले यांचे निधन ही भारतीय कलाविश्वाची हानी – भाजप खासदार बांसुरी स्वराज
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन ही भारतीय कलाविश्वाची आणि विशेषतः भारतीय संगीतविश्वाची अशी हानी आहे, जी खुद्द काळही भरून काढू शकणार नाही. आज प्रत्येक भारतीयाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वराचरणी हीच एक प्रार्थना आहे की, त्याने त्यांच्या आत्म्यास आपल्या पवित्र चरणी स्थान द्यावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी असे भाजपाच्या खासदार बांसुरी स्वराज यांनी म्हटले आहे.
-
नाशिक- बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील संशयित आरोपी असलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन
नाशिक- बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील संशयित आरोपी असलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे आदेश कंपनी प्रशासनाने दिले. नाशिक येथील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्यास दबाव टाकल्याचा कर्मचाऱ्यांवर आरोप होता. महिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या आठही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
-
आशा भोसले यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनाने अतिशय दुःख झालं. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केलं आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होतं. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन, असं लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांना श्रद्दांजली वाहिली.
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर खासदार कल्याण काळे यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज अखेरचा श्वास घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांमधून त्यांच्या प्रति असलेल्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या देशाला मंगेशकर परिवाराने वेगवेगळ्या कालखंडात आपल्याला गायक दिले आहेत. त्यातल्याच एक अशा भोसले होत्या, असं कल्याण काळे यांनी म्हटलंय.
-
लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर
लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला असून राज्य नदी संवर्धन योजनेतून कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात शिवनदी स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येईल. शिवनदी संवर्धनातून पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
-
दादाच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा वहिनी यांनी सूत्र आपल्याकडे घेतली – ज्योती मेटे
दादाच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा वहिनी यांनी सूत्र आपल्याकडे घेतली. बीडचा विकास दादा आमचे पालकमंत्री होते आमचा विकास करतील… सुनेत्रा वहिनी शिवधनुष्य पेलेला आहे… पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या… वहिनी निवडून येतीलच.. बारामतीकर सर्वाधिक मत घेणारे उमेदवार म्हणून वहिनींना मते द्या… शिवसंग्राम पक्ष वहिनींना पाठिंबा देत आहोत… विपरीत काळात त्यांनी घेतलेली जबाबदारी सुनेत्रा पवार चांगलं काम करतील… असं वक्तव्य ज्योती मेटे यांनी केलं आहे.
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर खासदार कल्याण काळे यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज अखेरचा श्वास घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांमधून त्यांच्या प्रति असलेल्या भावना व्यक्त करण्यात येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी देखील त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली, महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या देशाला मंगेश कर परिवाराने वेगवेगळ्या कालखंडात आपल्याला गायक दिले त्यातल्याच एक अशा भोसले होत्या असं कल्याण काळे यांनी म्हटलंय.
-
अदिती तटकरे यांना दादांच्या आठवणी सांगताना रडू कोसळले
अजित दादा वव्यक्ती नव्हते ते एक विचार होते आणि ते विचार घेऊन आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे… दादांना मुख्यमंत्री पाहण्याचे आमचे स्वप्न होते, परंतु सुनेत्रा पवार यांच्या रूपात आम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहोत… दादांचे अपुरे स्वप्न वहिनी पूर्ण करतील असं वक्तव्य अदिती तटकरे यांनी केलं आहे.
-
आशाताई यांच्या निधनामुळे देशात दुःख पसरला आहे – चंद्रशेखर बावनकुळे
आशाताई यांच्या निधनामुळे देशात दुःख पसरला आहे.. महाराष्ट्र देश आणि संपूर्ण जगावर संगीतातून अधिराज्य गाजविणारे आशाताई आज आपल्यात नाही.. हे संगीत जगताला मान्य नाही. 12 हजार पेक्षा अधिक गाणे त्यांनी गायले आहेत.. मी त्यांच्या अनेक कार्यक्रमात गेलो असता माझे त्यांनी सत्कार केला.. आणि भाषण द्यायला लावले.. मागे सात वर्षांपूर्वी त्यांनी असे केलं होतं.. कौटुंबिक होत्या, संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन त्यांच्यात होतं.. अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त केल्या आहेत.
-
शरद पवार यांनी ट्विट करत आशाताई भोसले यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
-
पुण्यातील काळेपडळ भागात रेस्क्यू शेल्टरमधून 11 महिला पळाल्या
पुण्यातील काळेपडळ भागात रेस्क्यू शेल्टरमधून 11 महिला पळाल्या. महिला सुरक्षा रक्षकाला औषध पाहिजे म्हणून आत नेल आणि त्यांनी बांधून महिलेला मारहाण केली. रेस्क्यू शेल्टरमध्ये सकाळच्या सुमारास कोणी नाही याचा फायदा घेत काढला पळ.
-
पनवेलमध्ये SIR कार्यशाळा; बोगस मतदारांवर सोमय्यांचा निशाणा
पनवेलमध्ये एस.आय.आर अंतर्गत आयोजित कार्यशाळेत माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. या वेळी मतदार यादी शुद्धीकरण आणि बोगस मतदारांवर कारवाई करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. सोमय्या यांनी सांगितले की, दुबार आणि बोगस मतदार शोधण्यासाठी मोहीम राबवली जाणार असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे. तसेच, पश्चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात संशयित नावे वगळली जातील, असा दावा त्यांनी केला. कार्यशाळेत कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचे आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
-
अशोक खरातने सोलापुरातही जमीन खरेदी केल्याची माहिती समोर
भोंदू अशोक खरात याने सोलापुरातही जमीन खरेदी केल्याची माहिती समोर. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात जवळपास 12 एकर जमीन खरेदी केल्याचे उघड. खरातचा सीए ललित पोफळे याने देखील पत्नीच्या नावावर जमीन खरेदी केलीय. विशेष म्हणजे पडीक जमिन खरेदी करुन त्यावर 2000 हजार डाळिंब झाडे असल्याचे दाखवण्यात आले.
-
आशा ताईंनी भारतीय संगीताला जगात पोहचवले- नितीन गडकरी
आशा भोसले यांनी भारतीय संगितला जगात पोहचवले. अशाताईंनी अनेक भाषामध्ये गाणं गायली. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध होते. माझ्या 61 वर्षी वाढदिवसाच्या कार्यक्रात आल्या होत्या. गीत म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिले असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
-
. आशाताई आपल्यातून निघून गेल्या. त्या असणं समाधानाची अनुभूती देत होतं – आशिष शेलार
आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुखात बुडाला. एका युगाचा अंत झाला. आशाताई आपल्यातून निघून गेल्या. त्या असणं समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं आयुष्य आणि प्रवास दुखाला कवटाळून दुसऱ्याला सुख देण्याचा मार्ग होतं. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. संगीत क्षेत्रातील कर्तृत्व जगाला देण आहे. – आशिष शेलार
-
आशा भोसले यांचं निधन – मुलाने दिली माहिती
प्रख्यात गायिका आशा भोसले यांचं निधन. त्यांचा मुलगा हेमंत भोसले यांनी माहिती दिली आहे. उद्या दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
-
कोणतीही विलीनीकरणाची चर्चा नाही – छगन भुजबळ
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा नाही, जयंत पाटील यांच्याकडून देखील विषय बंद झाला, आमच्याकडूनही बंद झाला असं छगन भुजबळ म्हणाले. याबाबत तुमच्या सूत्रांकडून आलेली माहिती आहे ,ज्या सूत्रांचं नाव तुम्ही सांगू शकत नाही. अशी माहिती आम्हाला कोणत्याही सूत्राने दिलेली नाही. हा विषय दोन्हीकडून बंद झाला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर भागात उघड्यावरील विहिरी बुजवण्याच्या हालचाली सुरू
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर भागात उघड्यावर तीन विहिरी आहेत. नाशिक दिंडोरी येथील घटनेनंतर प्रशासनाकडून विहिरी बुजवण्याच्या हालचाली सुरू आहेत. मोबदला दिल्याशिवाय विहीर बुजवू देणार नाही, अशा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
-
अवकाळी पावसामुळे मका कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ
गोंदिया जिल्ह्यात मका कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु असल्याचे दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसापूर्वी पीक वाचवण्याचा प्रयत्न बळीराजा करताना दिसत आहे.
-
बिबट्याची मुक्ताईनगरात दहशत
जळगावमधील मुक्ताईनगरात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. वन विभागाकडून येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह आणि बस स्थानक परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
-
बीडमध्ये एका रात्रीत उभारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
बीडच्या नेकनूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा आणि परवाना देण्याची मागणी होत होती. मात्र जागा आणि परवाना न मिळाल्याने अज्ञात भीम अनुयायांनी रात्रीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा पुतळा उभारल्याने भीम अनुयायांकडून आनंद साजरा करण्यात आला.
-
ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येणं टाळले
ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळले. कार्यक्रमस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांची खुर्ची नाही. मला लातूर येथील नियोजित कार्यक्रमसाठी जायचे आहे अशी माहिती निंबाळकरांनी दिली.
-
एकनाथ शिंदेंचा दौरा, धाराशिवमध्ये वातावरण तापले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे,शिवसेनेचे काही पदाधिकारी नजर कैदेत ठेवले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे आज धाराशिव येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहणार आहेत.
-
परप्रांतीयाचा मराठी तरुणावरती रेल्वेमध्ये जीवघेणा हल्ला
ठाणे रेल्वे स्थानकात आठ एप्रिल मारहाणीची घटना घडली असून या मध्ये एका तरुणावरती ठोशाबुक्क्याने जीव घेणा हल्ला बाप आणि मुलाने केला आहे. यामध्ये अमित पिरनकर गंभीर जखमी झाला असून डोळ्यावर आणि तोंडावर मारल्यामुळे कायदेशीर तक्रारी वरून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बाप आणि मुलांवरती गुन्हा दाखल करत अटक केली आहे. कामावरून घरी जात असताना अमित पीरणकर याला साहबलाल चौहान आणि मुलगा सुमित चौहान याने मारहाण केली होती.
-
गायमुख ते कॅडबरी मेट्रो सेवेला विलंब?
गायमुख ते वडाळा 32 किलो मीटर मेट्रो चार मार्गिकेचे त्यापैकी गायमुख ते विजय गार्डन अशी 22 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजप आमदार संजय केळकर यांच्या कडून ट्रायल रन मेट्रो चालवण्यात आली होती. मात्र नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2026 पर्यंत गायमुख ते कॅडबरी अशी मेट्रो सेवा सुरू होणार होती मात्र कारशेड आणि इतर कारणामुळे विलंबन लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणेकरांना घोडबंदर वाहतूक कोंडी पासून मुक्तता मिळावी म्हणून मेट्रो चार मार्गिका खुली करण्यात येणार होती. आता येणाऱ्या काळात तरी मेट्रो चार सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल विस्कळीत
नायगाव ते भाईंदर ओहरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल विस्कळीत झाली आहे. लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्याने रेल्वे स्टेशन वर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. आज सकाळ च्या वेळेत विरार ते चर्चगेट जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे
-
सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय
काल सोलापूर जिल्ह्यात 41.4 डिग्री सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक उच्चांकी तापमान असल्याचा पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलीय. तर शहरातील सिग्नल दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलेय. दरम्यान आगामी काळात सोलापूरचे तापमान आणखी किती वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
-
उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण
लाल कांद्यानंतर नव्याने निघत असलेल्या उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. उन्हाळी कांद्याला आठ ते बारा रुपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल झाले आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.
-
भाजप-शिवसेना आमदार आमदारांमध्ये श्रेयवाद
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व लोखंडवाला आणि सिंह इस्टेट जोडणाऱ्या १२० फूट डीपी रस्त्याचे भूमिपूजन केले. कांदिवली लोखंडवाला १२० फूट डीपी रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजप-शिवसेना आमदार आमदारांमध्ये श्रेयवाद रंगला. कांदिवली पूर्व लोखंडवाला येथून ठाकूर गावाकडे जाणाऱ्या १२० फूट डीपी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळताच भाजप आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या श्रेय घेण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.एवढेच नाही तर काल मागाठाणे विधानसभाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी १२० फूट डीपी रोडचे आज भूमिपूजन पण केले.
-
धाराशिवमध्ये शिंदे दौऱ्यापूर्वी अंतर्गत गटबाटी उफाळली, पोलीस प्रशासन अलर्टवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. संभाव्य तणाव टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून, आज सकाळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे-पाटील यांना शिरढोण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिंदे यांच्या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
-
अखेर नरभक्षक वाघ जेरबंद, चंद्रपूरच्या नागरिकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास!
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. तळोधी (बा.) वन परिक्षेत्रात या वाघाने धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे, २५ मार्च रोजी सावर्ला परिसरातील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या प्रमिला अरुण वाटगुरे (४५) या महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार केले होते. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि परिसरातील नागरिकांनी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली होती. नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेता वनविभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली होती. अखेर वनविभागाच्या पथकाने या वाघाला जेरबंद केल्याने तळोधी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
-
नाशिक आयटी कंपनी लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरण, फरार महिला आरोपीचा शोध सुरू
नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खान ही अद्याप फरार असून, तिला अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली आहे. प्राथमिक तपासानुसार, निदा खान स्वतः महिला असल्याने ती इतर हिंदू महिला कर्मचाऱ्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होती. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी SIT ची दोन विशेष पथके पुणे आणि नाशिकमध्ये गोपनीय शोध मोहीम राबवत आहेत. निदा खानच्या अटकेनंतर कंपनीत हिंदू तरुणींसोबत नेमके काय प्रकार घडत होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत, याचा मोठा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीची प्रक्रिया सुरू आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर; खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत एकाच मंचावर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते धाराशिव येथे आयोजित पत्रकार संघाच्या एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले, आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित असतील. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर एकाच मंचावर येणार आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची मोठी चर्चा रंगली आहे. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते धाराशिव शहरातील बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असून, नूतन जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
-
सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभाचा आज नारळ फुटणार, कन्हेरीतून वाजणार प्रचाराचे बिगुल
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज सकाळी १० वाजता बारामती तालुक्यातील कन्हेरी येथून होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अदिती तटकरे, आमदार सरोज अहिरे, आमदार सना मलिक, आमदार शंकर मांडेकर आणि आमदार सुनिल शेळके यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या प्रचार शुभारंभाच्या नारळ वाढवल्यानंतर आयोजित जाहीर सभेच्या माध्यमातून सुनेत्रा पवार मतदारांशी संवाद साधणार असून, प्रचाराची धुरा अधिक वेगाने पुढे नेणार आहेत.
-
१ मे रोजी विदर्भात काळा दिवस, स्वतंत्र राज्यासाठी विदर्भवाद्यांचा आक्रमक पवित्रा
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण विदर्भात ‘काळा दिवस’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली ही घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रात राहून विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदारांना न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने, आता आंदोलनाचे हत्यार उपसून निषेध नोंदवला जाणार आहे. विदर्भातील नागरिक आणि सर्व घटकांना हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे विदर्भवाद्यांचे म्हणणे आहे.
-
नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचा वादग्रस्त निर्णय, सभापतींसाठी आलिशान वाहनांवर ६० लाखांचा अतिरिक्त खर्च
नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ९ विषय समिती सभापतींसाठी आलिशान वाहने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे ६० लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. प्रशासनाने यापूर्वीच महापालिका अधिनियमात अशा सुविधेची तरतूद नसल्याचे स्पष्ट करून तांत्रिक आक्षेप नोंदवले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सध्या महापालिका आर्थिक अडचणींचा सामना करत असताना हा अनावश्यक खर्च असल्याचा आरोप करत काँग्रेस नगरसेवक अभिजीत झा यांच्यासह विरोधकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे आणि हा निर्णय नियमबाह्य व मनमानी असल्याचे म्हटले आहे. याउलट, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी कामकाजात सुसूत्रता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी ही वाहन सुविधा आवश्यक असल्याचे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे.