
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यासाठी आता ओबीसी संघटनांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षण बचावचा नारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यात ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात हे उपोषण करण्यात येणार आहे. येत्या १ ऑगस्टपासून ओबीसी बांधव साखळी उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नागपूर येथे नुकतीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास जोरदार विरोध करण्यात आला. या बैठकीनंतर साखळी उपोषणाची सुरुवात झाली आहे. आता हे आंदोलन राज्यभरात पसरणार आहे. जालना जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनीही यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या अंतरवाली सराटी गावातच आता ओबीसी बांधव उपोषण करणार आहेत. ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
नागपूरमधील उपोषणात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. ज्यात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश होता. यातून ओबीसी समाजाच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओबीसी नेत्यांनी जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा आणि मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. आज ओबीसींच्या साखळी उपोषणाचा पहिला दिवस आहे. जालना जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या या पावलामुळे मराठा आणि ओबीसी यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.