
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार राज ठाकरे आणि आम्ही एकत्र आल्याचं सांगत आहेत. त्यामुळे मनसे आणि उबाठा महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, दोन्ही नेते एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. कारण राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येतील याची काहीच गॅरंटी नाहीये, त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती झाली तर या युतीत महाविकास आघाडी असेल काय? असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आतली गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.
महापालिका निवडणुकीत एकत्र लढावं की स्वबळावर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्यांशी माझं बोलणं झालं. ते म्हणाले की, कदाचित ते हा विषय़ स्थानिक पातळीवर सोडतील. ठिक आहे. तसं असेल तर तसं करू, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत असून राज आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यताही बळावली आहे.
मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्या वेगळी समजणार नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं युनिट आहे. त्यांना जे योग्य वाटतं राजकीय दृष्ट्या, तसं वाटलं तर तसं करू. लढायचं तर नक्कीच आहे, असं सांगतानाच ओरबाडली गेलीय मुंबई. प्रचंड लूट सुरू आहे. कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढायची असते. तशी आम्ही लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महापालिकेवर भगवा झेंडा तसाच फडकवणार. मध्ये मध्ये ज्यांना किंमत नाही, अशा लोकांकडून मराठी माणसाला आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा केली जाते. याचा काही काडीचा फरक पडत नाही, असं सांगतानाच राज्यात मराठी अमराठी भाषिक गुण्या गोविंदाने राहतात. रक्तदान शिबीर करतो तेव्हा ते रक्त कुठल्या भाषिकाला जात नाही. आपण रुग्णासाठी रक्त देतो. इकडे गुण्यागोविंदाने नांदतात हे पाहवत नाही. म्हणून मराठी- अमराठी वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. कोणत्याही राज्याच्या भाषेचा द्वेष नाही. मुख्यमंत्री असताना कोरोनात मी काही कुणाला भाषेच्या किंवा धर्माच्या आधारावर वेगळं वागवलं नव्हतं. मी हिंदुत्ववादी आहे. पण मुसलमानांना काही वेगळं वागवलं होतं? नाही, असं त्यांनी सांगितलं.