ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 29 गाड्या, 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईला रवाना

वाशिम जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या २५० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 29 गाड्या, 250 कार्यकर्त्यांसह बडा नेता मुंबईला रवाना
uddhav thackeray
| Updated on: May 24, 2026 | 8:35 AM

महाराष्ट्र राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे वेगाने वाहत आहेत. त्याच आता विदर्भातील वाशिम जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का बसला आहे. वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुरेश मापारी हे त्यांच्या २५० कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

२९ वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना

वाशिमच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार झाल्यानंतर सुरेश मापारी यांनी आपल्या समर्थकांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीनंतर काल रात्रीच सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० ते २५० प्रमुख पदाधिकारी, सरपंच आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा मोठा गट मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. तब्बल २९ वाहनांचा मोठा ताफा वाशिममधून मुंबईकडे निघाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडण्याची दाट शक्यता आहे.

जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केल्याने नाराजी नाट्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच वाशिमच्या जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे सुरेश मापारी यांच्याकडून काढून घेतली होती. त्यानंतर बालाजी वानखेडे यांच्याकडे ही सूत्रे सोपवण्यात आली होती. पक्षाच्या अचानक घेतलेल्या या निर्णयावर सुरेश मापारी यांनी प्रचंड नाराजी वर्तवली होती. तसेच ठाकरे गटाचे स्थानिक खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत राजकारणावर सुरेश मापारी गेल्या काही काळापासून कमालीचे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यापूर्वी सुरेश मापारी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती. मात्र त्यांनी अखेर भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी निवडणुकांवर होणार मोठा परिणाम

सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील अत्यंत वजनदार नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) सभापती यांसारखी अनेक महत्त्वाची पदे यशस्वीपणे भूषवली आहेत. वाशिमच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे खूप मोठे जाळे त्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसेल, असे म्हटलं जात आहे.

Follow Us