Maharashtra landslide death toll : राज्यात आतापर्यंत 129 मृत्यू, तळीये दुर्घटनेतील मृतांचे बळी वाढतेच, थोरातांकडून आकडा वाढण्याची भीती

| Updated on: Jul 23, 2021 | 5:58 PM

गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल 129 नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यातील काही भागात दरड कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचं थोरात म्हणाले.

Maharashtra landslide death toll : राज्यात आतापर्यंत 129 मृत्यू, तळीये दुर्घटनेतील मृतांचे बळी वाढतेच, थोरातांकडून आकडा वाढण्याची भीती
Balasaheb Thorat on Flood situation
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल 129 नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यातील काही भागात दरड कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचं थोरात म्हणाले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण 5 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. (According to Balasaheb Thorat, 129 people have died due to rains in the state)

महाड तालुक्यातील (Mahad) तळीये गावात भीषण दरड कोसळून 36 जणांचा (Taliye Landslide) मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 129 वर पोहोचली आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.

तळीये गाव उद्ध्वस्त, 38 मृतदेह मिळाले

महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास 35 घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं होतं. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणंही अवघड झालं. अखेर आज दुपारी 1 च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी 30 पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलादपूर तालुक्यात भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावातही भूस्खलन झालं आहे. महाडच्या तळीये गावाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही गावात डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात काही घरं गाडली गेली. त्यामुळे या दोन्ही गावातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय.

चिपळूण आणि खेड तालुक्यातही दरड कोसळली

चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खेडमधील धामणंदच्या दुर्घटनेनंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आला; व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

Raigad Landslide : रायगडला हादरे सुरुच, आता पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जण दगावले, राज्यभरात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

According to Balasaheb Thorat, 129 people have died due to rains in the state