IMD Rain Alert : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील 72 तासात पाऊस बरसणार; कुठे सरी, कठे कडक ऊन? ताजा अंदाज आला

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाने ओढ दिलेली असताना आता हवामान विभागाने राज्याच्या काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

IMD Rain Alert : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील 72 तासात पाऊस बरसणार; कुठे सरी, कठे कडक ऊन? ताजा अंदाज आला
Maharashtra Rain Alert Farmer
Image Credit source: Google
| Updated on: Aug 24, 2026 | 6:46 PM

राज्यात पावसाने काहीशी ओढ दिली असताना आता पूर्व विदर्भासाठी हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवस पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांना पुढील 72 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा परिणाम

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे. ही प्रणाली पुढे सरकत असल्याने तिचा परिणाम पूर्व विदर्भातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत चांगला, तर काही ठिकाणी साधारण पाऊस पडू शकतो. असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात विदर्भात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून ती सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आगामी काळातील पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्याच्या इतरही भागात पावसाची मोठी तूट

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. अनेक जिल्ह्यांत 50 टक्क्यांहून अधिक पावसाची तूट निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, आगामी तीन दिवसांत विदर्भातील तुरळक भागांत पावसाची शक्यता असली तरी त्यानंतर राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घाट परिसरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि प्रवाशांनी या काळात हवामानाची स्थिती लक्षात घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये चिंता वाढणार

ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एकीकडे पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना 72 तासांचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील मोठ्या भागात पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us