
मान्सून आता महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यातून माघारी परतला असला तरीही अनेक ठिकाणी पावसाचे संकेत आहेत. तर राज्यात कोकण वगळता उर्वरित भागात ऑक्टोबर हीटचे चटके बसत आहेत. मान्सूनने निरोप घेतला असला तरी यंदा दिवाळीतही पावसाचा फटका बसण्याचा धोका कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडे तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे ही परिस्थिती उद्भवली असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज कोकणात सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट वर्तवला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस कोसळू शकतो. मात्र, उर्वरित राज्यात उन्हाचे चटके कायम असतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत स्थिती काय ?
मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता नसून कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. दमट हवेमुळे दिवसभर उकाडा जाणवेल आणि घामाच्या धारा वाहू शकतात. तर ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही कोरडे हवामान असेल. पालघर जिल्ह्यात मात्र आज आकाश ढगाळ राहू शकते. काही भागांमध्ये पावसाच्या हल्क्या सरींची शक्यता असली तरी मुसळधार पाऊस कोसळणार नाही.
48 तास महत्वाचे
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील 48 तास महत्वाचे आहेत. ऐन दिवाळीत पावसाचं विघ्न येऊ शकतं, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात 7 दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. दक्षिणे पूर्ण अरबी सागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन अजूनही कायम आहे. वादळाचा धोका आजही दक्षिणेकडच्या राज्याने असेल. महाराष्ट्राला थेट धोका नाही, मात्र, हवामान वेगाने बदलू शकते. पढील 48 तासांत कमी दबावाचे क्षेत्र तयार होणार असून ते लक्ष्यद्विपकडून पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकेल. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर रोजी देखील कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. तिथे हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीदेखील पावसातच जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.