अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्वीस्ट! सुजय विखेंना कोर्टाचा धक्का; अध्यक्षपद जाणार?
सहकार पॅनेलकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपदी निवड झाली. मात्र आता यामध्ये सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना सहकार न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कुणाल जयकर, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी: Ahilyanagar DCC Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाजी मारत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपद मिळवले. गुरुवारी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांची निवड झाली. यामध्ये सहकार पॅनेलकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपदी निवड झाली. मात्र आता यामध्ये सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना सहकार न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या…
सुजय विखेंना नोटीस…!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना सहकार न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 16 नोव्हेंबर रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सुजय विखे हे राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक असताना कारखान्याचे कर्ज थकीत झाल्याने ते जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याचा दावा एकनाथ घोगरे यांनी केला आहे. त्यामुळे विखे यांची संचालकपदासाठीची निवडणूक अपात्र ठरवावी, अशी मागणी करत घोगरे यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयाने नोटीस बजावली असून आता 16 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
वकिलांनी काय सांगितलं?
काल झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सुजय विखे यांनी फॉर्म भरला होता. सुजय विखे यांच्या फॉर्मला आम्ही हरकत घेतली आहे. ते राहुरी संचालक असताना ते थकबाकीदार असले. कारखान्याने जिल्हा बँकेचे कर्ज थकवले. कायद्याने ते थकबाकीदार आहेत, त्यांच्या सर्व कागदपत्रांवर सह्या आहेत. आम्ही ही सर्व बाब निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडली होती. मात्र राजकीय प्रभावाखालाी त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही, त्याविरोधात आम्ही औरंगाबाद येथील खंडपीठासमोर दाद मागितली.
आता खंडपीठाने याबाबत को-ऑपरेटिव्ह कोर्टात दाद मागा असे सांगितले. आम्ही आता नगरच्या सहकारी न्यायालयात दाद मागितली आहे. सुजय विखे यांचा निवडणुकीचा अर्ज मंजुर केला त्याला आम्ही आव्हान दिले आहे. कोर्टाने आता तात्काळ त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस काढली आहे. कोर्टाने आता १६ तारखेला त्यांचे स्पष्टीकरण मागितले आहे, असं वकील सुरेश लगड यांनी सांगितले आहे.
