राज्यातील आरोग्यसेवा विस्कळीत, निवासी डॉक्टरांचे आंदोलन आणखी तीव्र; रुग्णांवर काय परिणाम होणार?

राज्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. निवासी डॉक्टरांनी आंदोलन आणखी तीव्र केलं आहे.

राज्यातील आरोग्यसेवा विस्कळीत, निवासी डॉक्टरांचे आंदोलन आणखी तीव्र; रुग्णांवर काय परिणाम होणार?
| Updated on: Aug 06, 2026 | 7:35 AM

राज्यातीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि राज्यातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. निवासी डॉक्टरांनी मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्यभर आंदोलन तीव्र केलं आहे. सेंट्रल MARD ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील MD/MS/DNB निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आता पुढील आदेशापर्यंत नियमित वैद्यकीय, शैक्षणिक आणि बिगर-जीव वाचविणाऱ्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
नियमित OPD, IPD, वॉर्ड राऊंड, नियोजित शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक उपक्रम, सेंट्रल लॅब आणि फिव्हर OPDही बंद राहणार आहे. मात्र आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे. कॅज्युअल्टी, ट्रॉमा, ICU, लेबर रूम, आपत्कालीन शस्त्रक्रिया सुरू राहतील.

इमर्जन्सी लॅब, ब्लड बँक आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जीव वाचविणाऱ्या उपचारांची गरज असलेल्या कोणत्याही रुग्णाला सेवा नाकारली जाणार नाही. निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची सेंट्रल MARD ची शासनाकडे मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

आंदोलनाचं कारण काय?

ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी (Doctor) सहा महिन्यांचा ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (सीसीएमपी) पूर्ण केलाय. त्यांना आधुनिक किंवा ॲलोपॅथिक औषधे लिहून देण्याची आणि एमएमसीकडे नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आलीये. परंतु एका वैद्यकीय प्रणालीत प्रशिक्षित डॉक्टरांना पूर्ण वैद्यकीय प्रशिक्षण घेतल्याशिवाय दुसऱ्या प्रणालीचा सराव करण्याची परवानगी देऊ नये. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा घसरेल आणि नियामक प्रणाली कमकुवत होईल, असा अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांचा युक्तिवाद आहे.

निवासी डॉक्टरांकडून आपात्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्डने 24 तासांचा अल्टिमेट दिला आहे. त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास आपात्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाविषयी न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us