मावस भावाला भेटण्यासाठी निघाली, दुचाकी काढली अन् तेवढ्यात…; एका सेकंदात सुखी संसार उद्ध्वस्त

महाराष्ट्रात सोलापूर आणि पालघर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून, एक ७ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मावस भावाला भेटण्यासाठी निघाली, दुचाकी काढली अन् तेवढ्यात...; एका सेकंदात सुखी संसार उद्ध्वस्त
solapur
| Updated on: Jun 03, 2026 | 9:17 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आज राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकूण 3 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर ७ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. यातील पहिली घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात घडली. या ठिकाण एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी घटना पालघर जिल्ह्यात घडली. यात रस्त्यावर उभे असलेल्या पोकलेन मशीनला दुचाकी धडकल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मावस भावाला भेटायला जाणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण अपघात घडला. मावस भावाला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीचा एसटी बससोबत झालेल्या समोरासमोर अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैसगाव जवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील नेरले येथील रहिवासी असलेले सागर रंभा काळे (वय ३६) आणि त्यांच्या पत्नी नेहा सागर काळे (वय २४) हे आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह म्हैसगाव येथे मावस भावाला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मात्र, म्हैसगाव जवळ समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची ७ वर्षांची मुलगी दुर्वा सागर काळे ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी भरधाव वेगाने बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल बस चालक धीरज गोरोबा धिवरे याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सागर यांचे भाऊ प्रवीण रंभा काळे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे पोकलेनला दुचाकीची धडक

तर दुसरीकडे सफाळे-पालघर राज्यमार्गावर केळवे भरणेपाडा येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या पोकलेन मशीनला दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात एका ५१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. विपीन सावे (वय ५१) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सफाळे-पालघर मार्गावर रस्त्याच्या खोदकामासाठी आणलेले पोकलेन मशीन कंत्राटदाराने रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक अवस्थेत रस्त्यावरच उभे करून ठेवले होते. रात्री १०.३० च्या सुमारास विपीन सावे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना, अंधारामुळे त्यांना रस्त्यावरील या मशीनचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट पोकलेनला जाऊन धडकली. हा अपघात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी केळवे ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us