
राज्यातील अपघातांची मालिका काही थांबताना दिसत नाही. आज एकाच दिवशी राज्यात विविध ठिकाणी पाच अपघात झाले. या अपघातात 3 जण ठार झाले असून 20 जण जखमी झाले आहेत. यातील काहीजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुठे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला, कुठे ड्रायव्हरला डुलकी लागल्याने अपघात झालाय. तर कुठे देवीच्या दर्शनाहून येत असताना अपघात झाला आहे. पोलिसांनी या अपघातांचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
अकोल्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. मूर्तिजापूर- दर्यापूर मार्गावरील पायटांगी फाट्याजवळ तीन वाहनांचा म्हणजे कार, ट्रॅक्टर आणि ऑटोचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ऑटोचालकाचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूरवरून दर्यापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमावलं आणि समोरून येणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ऑटोचा चक्काचूर झाला असून प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने मूर्तिजापूर येथून अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कठडे तोडून कार थेट 20 फूट खोल नाल्यात
बुलढाण्याताली मोताळा येथे मोताळा आयटी कॉलेज जवळही मोठी दुर्घटना झाली आहे. धावत्या कारचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे कार नियंत्रित होऊन रस्त्याचे कठडे तोडून तब्बल 20 फूट खोल नाल्यात कोसळल्याचे घटना बुलढाण्याच्या मोताळा येथील आयटीआय कॉलेज जवळ घडली आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरात मधील कुटुंब हे दिवाळी साजरी करण्यासाठी चिखली येथील आपल्या नातेवाईकाकडे जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही, परंतु पाच जण गंभीर जखमी झाले असून, कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
भरधाव वेगातील कार उलटली
जालन्यात सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आहे. वडीगोद्री शिवारात ट्रॅव्हल्सने पाठीमागून धडक दिल्याने भरधाव वेगात असलेली कार उलटली. ट्रॅव्हल्सने पाठीमागून धडक दिल्यानंतर स्विफ्ट कार दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर जवळपास चार ते पाच वेळेस पलट्या खात विरुध्द दिशेला आली. या अपघातातील कारमध्ये असलेले तीन जण थोडक्यात बचावले असून ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
आजी – आजोबा जखमी
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारला रायगड जिल्ह्यातील खालापूर टोल नाक्यावर अपघात झाला आहे. चालकाला अचानक डूलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. या धडकेत टोल कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली आहे.कारमधील वयोवृद्ध आजी-आजोबा गंभीर जखमी झाले असून चालक, त्याची पत्नी आणि दोन मुले किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि लोकमान्य ॲम्ब्यूलन्स सर्व्हिसच्या मदतीने तात्काळ मदतकार्य राबविण्यात आले. खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला
सोलापूरच्या कुर्डू गावच्या दोघा जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. दोघेही मित्र भोलाई देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरुन चालले होते. तितक्यात समोरून आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. पुणे – सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावाजवळ ही घटना घडली. दोन्ही कॉलेज तरुणांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाल्याने माढ्यातील कुर्डू गावार शोककळा पसरली आहे.