
राज्यात आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. शिर्डी, नांदुरा आणि करमाळ्याजवळ झालेल्या या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हैदराबादहून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या एका विना नंबरच्या हायवाने भाविकांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला होता.
या अपघातातील मृत व्यक्तींना आणि जखमींना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढावे लागले. सध्या जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, वडीगोद्री परिसरात विना नंबरच्या हायवाच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या हायवा कार बेफाम वेगात चालतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा शहराजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आर्टिका कारमधील तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील अडकलेल्या जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तास लागले.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-कुर्डुवाडी रोडवर वरकुटे गावाजवळ आज पहाटे साडेचारच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. कारमधील सर्व प्रवासी कर्नाटकातून गुजरातच्या दिशेने निघाले होते. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यानंतर करमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.