‘पारु’ पोरकी झाली! पारंपरिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, काशीराम चिंचय कालवश

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काशिराम चिंचय यांनी कोळी-आगरी समाजातील पारंपरिक गीतांचा ठेका सातासमुद्रापार नेला. कोळी संगीताच्या ठेक्यावर महिला-पुरुष, आबालवृद्ध सर्वांनाच ताल धरायला भाग पाडले.

पारु पोरकी झाली! पारंपरिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, काशीराम चिंचय कालवश
काशिराम चिंचय
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 8:14 AM

मुंबई : पारु गो पारु वेसावची पारु, वेसावची पारु नेसली गो, मी हाय कोली यासारख्या एकापेक्षा एक पारंपरिक कोळीगीतांचा बादशाह आणि सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय (Kashiram Chinchay) यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील वेसावे स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. काशिराम चिंचय यांनी ‘वेसावकर आणि मंडळी’ (Vesavkar Aani Mandali) या सुप्रसिद्ध कलापथकाद्वारे निर्मित अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. कोळी-आगरी समाजातील कुठलाही हळदी सोहळा या कोळीगीतांवरील नृत्याशिवाय पूर्ण होत नाही.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे काशीराम चिंचय यांना उपचारासाठी आधी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या ब्रह्मकुमारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काशिराम चिंचय यांची गाजलेली गाणी

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काशिराम चिंचय यांनी कोळी-आगरी समाजातील पारंपरिक गीतांचा ठेका सातासमुद्रापार नेला. कोळी संगीताच्या ठेक्यावर महिला-पुरुष, आबालवृद्ध सर्वांनाच ताल धरायला भाग पाडले. अमराठी प्रेक्षकांच्या ओठातही या गाण्यांचे शब्द रुजले. पारु गो पारु वेसावची पारु, वेसावची पारु नेसली गो, मी हाय कोली, डोल डोलतंय वाऱ्यावर, डोंगराचे आरुन एक बाई चांद उगवला, हीच काय ती गोरी गोरी पोरी, सन आयलाय गो यासारख्या एकाहून एक सरस कोळीगीतांचे महाराष्ट्रातील असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमात अजूनही सादरीकरण होते.

वेसावकर आणि मंडळी

काशिराम चिंचय यांनी वेसावकर आणि मंडळी या सुप्रसिद्ध कलापथकाद्वारे निर्मित केलेल्या वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल या अमिताभ बच्चन आणि काशीराम यांच्या आवाजातील संवाद आजही लोकप्रिय आहे. काशिराम चिंचय यांच्या निधनाने आगरी-कोळी समाजावर शोककळा पसरली असून लोकसंगीतात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

संबंधित बातम्या :

 ग्रेट कॉमेडियन कपिल शर्माच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार, नावही ठरलं !

संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्रात असतानाही नील नितिन मुकेशने केली अभिनयाची निवड

 ‘म्हणून सलमानला कॅटरीनाने लग्नाला बोलावलं नाही’ आयुष शर्मानं केला मोठा खुलासा