Rahul Narvekar : अलिबागमध्ये आदिवासींची जमीन लाटल्याच्या संजय राऊतांच्या आरोपावर राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण
Rahul Narvekar : खासदार संजय राऊत यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अलिबागमधील आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप केला. त्यावर राहुल नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्र लिहून ते एक्सवर पोस्ट केलं. या पत्रातून संजय राऊत यांनी राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा गंभीर आरोप केला. अलिबागच्या म्हात्रोळी गावातील गरीब आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा आरोप राहुल नार्वेकर यांच्यावर केला. त्यावर आता राहुल नार्वेकर यांनी स्पष्टकीरण दिलं आहे. “संजय राऊत यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. ज्या जमिनीवरून आरोप होत आहेत, ती आदिवासी जमीन नसून भोगवटा क्रमांक 1 ची जमीन आहे. आदिवासींनी 2024पूर्वी केलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा झाला आहे. 2024 सालापर्यंत झालेल्या तक्रारींमध्येही कुठेही नार्वेकर कुटुंबाचा नावाचा उल्लेख नाही” असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं.
“2024 पर्यंत जमिनीची मालकी बलदेवसिंह जाला यांच्याकडे होती. नार्वेकर यांच्या पत्नीने ही जमीन बलदेवसिंह जाला यांच्याकडून 2024नंतर विकत घेतली आहे. संबंधित तक्रारींबाबत जाला यांनी या घरांऐवजी पर्यायी जागेवर आदिवासींना पक्के घरं बांधून दिली आहेत. सोबतच, आदिवासी बांधवांना पैसे व बोअरवेल ही दिलेली आहे. या पुनर्वसनानंतर आदिवासी बांधवांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते” असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
प्रशासनाकडून वस्तुस्थिती स्पष्ट
अलिबागमधील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाचा 2025 सालाचा महत्त्वपूर्ण खुलासा. आदिवासी कुटुंबांना पर्यायी जागेवर घरे बांधून दिल्याचा प्रशासनाचा दावा. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी (सारळ) येथील आदिवासी कुटुंबांच्या जमीन आणि पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून वस्तुस्थिती स्पष्ट. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल तक्रारीच्या अनुषंगाने अपर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण, अलिबाग यांच्याकडून सविस्तर चौकशी अहवाल सादर. संबंधित प्रकरणात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून परिस्थितीची तपासणी केली .
पसंतीनुसार घरे बांधण्यासाठी मोबदला
म्हात्रोळी येथील १९ आदिवासी कुटुंबांसाठी पर्यायी जागेवर 19 खोल्यांची घरे बांधून दिल्याची अहवालात नोंद. संबंधित कुटुंबांना मूलभूत सुविधांसह राहण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याची प्रशासनाची माहिती. काही कुटुंबांनी नव्याने बांधलेल्या घरांमध्ये वास्तव्यास सुरुवात केल्याचे चौकशीत स्पष्ट. उर्वरित 8 जणांना त्यांच्या पसंतीनुसार घरे बांधण्यासाठी मोबदला देण्यात आल्याचे अहवालात नमूद. संबंधित कुटुंबांच्या लेखी जबाबांमध्ये सध्याच्या पुनर्वसनाच्या ठिकाणी कोणतीही तक्रार नसल्याचे नमूद. मांडवा सागरी पोलीस ठाण्याकडूनही तक्रारींची चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान काही तक्रारदारांनी आपली तक्रार शिल्लक नसल्याचे लेखी स्वरूपात दिले होते. प्रशासनाने केलेल्या स्थळपाहणी, चौकशी आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे वस्तुस्थितीचा सविस्तर अहवाल आयोगाकडे सादर.
म्हात्रोळी येथील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण माहिती समोर. संबंधित तक्रार प्रकरण निकाली काढण्याची अलिबाग प्रशासनाची राज्य मानवाधिकार आयोगाकडे विनंती