दणदण करतच येणार… आज आणि उद्या, अलर्ट रहा, दुहेरी संकट दारात; हवामान खात्याचा मोठा इशारा
IMD Rain Alert : हवामान विभागाच्या इशाऱ्याने राज्यातील जनतेची झोप उडाली आहे. आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी आज आणि उद्या अलर्ट नागरिकांना अलर्ट राहण्यास सांगतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होताना पहायला मिळत आहेत. राज्याच्या काही भागात सूर्य आग ओकत आहे, तर दुसरीकडे काही भागात अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. अशातच आता हवामान विभागाच्या इशाऱ्याने राज्यातील जनतेची झोप उडाली आहे. आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी आज आणि उद्या अलर्ट नागरिकांना अलर्ट राहण्यास सांगतले आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुढील दोन दिवस धोक्याचे
हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात आज आणि उद्या हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. या काळात वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे. दोन दिवस तापमान सामान्य राहणार असल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र 8 तारखेपासून तापमानात वाढ होऊन तापमान 45 अंश सेल्सियस पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
मे महिन्यातील जास्तीत जास्त दिवस राहणार उष्णतेचे राहणार आहे, कारण उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे मे महिना विदर्भाला चटके देणारा महिना ठरणार आहे. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस सावध राहण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग
हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले व त्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा सुटल्याने कापणीला आलेले धान पीक तसेच आंबा व भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी
भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता नव्याने आलेल्या पावसामुळे कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या धान पिकाला धोका निर्माण झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडत असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात असून सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. तर हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडला आहे. यामुळे फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांची धांदल उडाली.
नंदुरबारमध्येही अवकाळीचा कहर
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकार्डे परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतातून काढून ठेवलेले पीक खराब होण्याची शक्यता आहे. मात्र नव्याने लागवड केलेल्या फळबागांना पावसामुळे काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे.