Maharashtra Rain Update : ऑक्टोबरच्या शेवटी वारं फिरलं, उद्या राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस, महत्त्वाचा हवामान अंदाज आला!
हवामान विभागाने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यासाठी अंदाज वर्तवला आहे. यामध्ये राज्यात कुठे कुठे पावसाची हजेरी असणार, कुठे हवामान कोरडे राहणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, चला जाणून घेऊ...

ऑक्टोबर महिन्यामध्ये सगळेजण प्रचंड उकाड्याने हैरान झाले आहेत. दिवाळी तोंडावर आली आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान कसं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता उद्या म्हणजे २८ ऑक्टोबरसाठीचा हवामानाच अंदाज समोर आला आहे. आज काही भागांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली असली तरी आता उद्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या महिन्यामध्ये अनेकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता पण सर्व अंदाज खरे ठरले नाहीत पण आता हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. मात्र काही जिल्ह्यांमद्ये वादळी वाऱ्याच्या आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड इथे हवामान कोरडे राहणार आहे. पण त्याचवेळी रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह मेघराजा बसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली आहे.
दुसरीकडे धुळे, नंदुरबार आणि जळगाव याठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येऊ शकतो. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होताना पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा जिल्ह्यामद्ये कोरडे हवामान असेल. सांगलीत हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह कोसळधारा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि घाटमाथा परिसरामध्ये काही जागी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे इथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर सोलापूरमध्येही हवामान कोरडे राहणार आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे. बीडमध्ये वातावरण कोरडं राहणार आहे.
उद्या विदर्भातील अकोला, अमरावती आणि वाशिम हे जिल्हे सोडता भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.