
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा लाडका मावस भाऊ बाळराजे माळी यांचे काल (९ ऑगस्ट) रात्री दुःखद निधन झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे चाकणकर कुटुंबियांवर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर शोककळा पसरली आहे. बाळराजे यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रूपाली चाकणकर यांनी आपल्या लाडक्या भावाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवर एका भावूक पोस्ट लिहिली आहे. “बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा, असं कसं न सांगता निघून गेला. न सांगता गेलास….. काय आणि कशी श्रद्धांजली वाहू.” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच “माझ्या लाडक्या भावाला अखेरचा निरोप…” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
बाळराजे माळी हे आपल्या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावासाठी परिचित होते. त्यांच्या या स्वभावगुणामुळे कुटुंबात आणि मित्रपरिवारात त्यांना विशेष मान होता. चाकणकर यांच्यासाठी ते केवळ मावस भाऊ नव्हते, तर एक जवळचे मित्र आणि आधार होते. रक्षाबंधनाच्या दिवशीच हे दुःखद वृत्त समजल्यामुळे चाकणकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. भावा-बहिणीच्या खास सणाच्या दिवशी अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बाळराजे माळी यांच्या निधनामुळे चाकणकर कुटुंबीयांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी बाळराजे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत चाकणकर कुटुंबीयांप्रती सहानुभूती दर्शवली आहे. बाळराजे माळी यांच्या निधनाने माळी कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी, राजकीय मतभेद बाजूला सारून अनेक मान्यवरांनी शोकसंदेश पाठवले आहेत. त्यांच्या निधनाने मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.