
भारतात क्रिकेट प्रेमींची काही कमतरता नाही. तसं पहायला गेलं तर हा खेळ जगात अनेक देशांत खेळला जातो, जगभरात चाहतेही असंख्य आहेत. पण भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नव्हे तर ते एक इमोशन आहे. बहुसंख लोकांना क्रिकेटची आवड, प्रेम सगळंच असतं. सध्या टी-20 वर्ल्डकपचा फिव्हर असून भारतात आणि श्रीलंकेत हे सामने खेळले जात असून क्रिकेट चाहत्यांसाठी तर ही मोठी पर्वणीच आहे. मात्र क्रिकेटप्रेमाचा हा रंग फक्त सामान्य नागरिकांनाच नव्हे तर मंदिरांना म्हणजे राज्यातील प्रसिद्ध मंदिरांच्या पुजाऱ्यांनाही लागला आहे.
राज्यातील प्रसिद्ध मंदिरांची कोल्हापूरमध्ये 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान ‘मंदिर क्रिकेट लीग’ रंगणार आहे. याच स्पर्धेसाठी मोठमोठ्या मंदिरांचे अधिकारी, पुजारी आ्रणि कर्मचारी सज्ज झाले असून त्यांचा तर मैदानावर सरावही सुरू झाला आहे. यंदा पहिल्यांदाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची टी देखील या क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या सरावामध्ये थेट मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे देखील धोतर आणि नेहरी शर्ट या पारंपारिक पोशाखत मैदानात उतरलेले दिसले.
कोल्हापूरमध्ये 14 ते 16 फेब्रुवारी होणाऱ्या मंदिर क्रिकेट लीग या स्पर्धेसाठी जर्सीचं वाटपही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सहअध्यक्ष औसेकर यांच्याकडून सर्व खेळाडूंना करण्यात आलं. पुजाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी मैदानात उतरून कसून सराव केला.
कोल्हापूर येथे 14, 15 आणि 16 असे तीन दिवस मंदिर प्रीमिअर लीग भरणार आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात मंदिर या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यावेळेस कोल्हापूर येथे होणाऱ्या प्रीमीअर लीगमध्ये आम्ही सगळे सहभागी होत आहोत. आणि मला या गोष्टीचा सर्वाज जास्त आनंद आहे की पहिल्यांदाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सर्व कर्मचारी, अधिकारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मंदिरे समितीचं नावं आत्तापर्यंत खूप नावाजलं आपे, तसंच या स्पर्धेत सहभागी होऊन या लीगमध्येही त्यांना प्रथम पारितोषिक मिळावं अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले.