दादागिरी करून गाडीच्या टपावर कबुतरांना धान्य देणाऱ्या व्यक्तीला दणका, नागरिकांचा मुख्यमंत्र्यांना मोठा प्रश्न

काल एक व्यक्ती चक्क गाडीवर टप ठेऊन कबुतरांना धान्य खाण्यास देत होता. आता त्याच्यावर कारवाई करण्यात आलीये. दादरच्या कबुतरखाना परिसरात कबुतरांना धान्य देण्यास मनाई असताना देखील काही लोकांकडून धान्य दिली जात आहेत.

दादागिरी करून गाडीच्या टपावर कबुतरांना धान्य देणाऱ्या व्यक्तीला दणका, नागरिकांचा मुख्यमंत्र्यांना मोठा प्रश्न
mumbai
| Updated on: Aug 10, 2025 | 9:07 AM

कोर्टाच्या आदेशानंतर दादरच्या कबुतरखाना बंद करण्यात आलाय. मात्र, अजूनही काही लोक कबूतरांना धान्य देत आहेत. जैन समाजाकडून मोठे आंदोलन करण्यात आले आणि जी ताडपत्री पालिकेकडून टाकण्यात आली, ती फाडली. काल एक व्यक्ती चक्क गाडीवर टप ठेऊन कबुतरांना धान्य खाण्यास देत होता. आता त्याच्यावर कारवाई करण्यात आलीये. दादरच्या कबुतरखाना परिसरात काल एका व्यक्तीने गाडीच्या टपावर कबुतरांना धान्य घातल्याने त्याच्यावर कारवाई करत त्याची गाडी जप्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखाना ट्रस्टने परिसरात जागोजागी फलक लावून आवाहन केले आहे की, कोणीही कबुतरांना धान्य घालू नये. कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्रस्टने महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली असून, महापालिकेने सहा ते आठ या सकाळच्या वेळेत धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिली आहे.

मात्र, ती अद्याप लेखी स्वरूपात मिळालेली नसल्याने हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन फलकांमधून करण्यात आलं आहे. कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का शिवडीतील नागरिकांनी मोठा प्रश्न उपस्थित केलाय. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही शिवडी बीडीडीचा पुनर्विकास मार्गी लागत नसल्याने नाराज रहिवाशांनी शिवडी बीडीडी परिसरात केंद्र, राज्य सरकारचा निषेध करणारे फलक लावले आहेत.

शिवडी बीडीडीच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा पत्र देण्यात आले, पण या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांची वेळ मिळत नाही. मात्र विशिष्ट समाजाकरिता कबुतरांच्या खाद्यावर अवघ्या 12 तासांत मुख्यमंत्री बैठक बोलावतात. आम्हाला कमी लेखण्याचे पाप हे सरकार करीत आहे, अशा आशयाचे फलक शिवडी परिसरात लावण्यात आले आहेत. शिवडी बीडीडीचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी अनेक वर्ष पाठपुरावा करीत आहे.

पण केंद्र आणि राज्य सरकारला शिवडीवासीयांचे काहीच सोयरसुतक नाही. त्यांना कबुतरे महत्त्वाची आहेत, शिवडीतील रहिवासी नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर लवकरच आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. आता हे फलक चर्चेचा विषय ठरला आहे