एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या कमिशनच्या वक्तव्यावर मकरंद अनासपुरेंचा टोला; थेट म्हणाले..
35 कोटी रुपयांच्या कमिशनच्या दाव्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड चर्चेत आले आहेत. माझ्यासोबत सायकलवर फिरणारे आज फॉर्च्युनरमध्ये फिरत असल्याचं ते म्हणाले. या वक्तव्यावरून आता मकरंद अनासपुरे यांनी टोला लगावला आहे.

नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या सुरेश भट सभागृहात ‘जलक्रांती’ परिषद आयोजित करण्यात आलं. या परिषदेला पाणी फाऊंडेशनचा संस्थापक आणि अभिनेता आमिर, नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे उपस्थित होते. नाम फाऊंडेशनच्या देशभरातील कामगिरीविषयी मकरंद अनासपुरे यांनी माहिती दिली. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. विदर्भात शेतकऱ्याला किडणी विकायला लागत आहे, कांदा उत्पादकांना भाव मिळत नाहीये, हे दुर्देव असल्याचं अनासपुरे म्हणाले.
नाम फाऊंडेशनचं काम
“आम्ही 2016 मध्ये नागपूर जिल्ह्यातील कोही टाकली या गावात 70 एकर परिसरात तलाव बांधलं होतं. त्यानंतर तिथली 250 एकर जमीन ओलिताखाली आली. 2 हजार 887 गावांमध्ये वॉटर बॉडीचं काम केलं. याच प्रमुख श्रेय हे नाना पाटेकर यांना जातं. नाम फाउंडेशनचं काम चांदा ते बांधा सुरू आहे. काश्मीरमधील विद्यार्थ्यांचं काम असेल किंवा इतर राज्यात.. सगळीकडे या फाऊंडेशनचं काम चालू आहे. माणसाने माणसासाठी सुरू केलेली ही माणुसकीची चळवळ हळूहळू वाढत आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
“शेतकऱ्याला किडनी विकावी लागत असेल तर..”
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते पुढे म्हणाले, “एवढं काम करत असताना विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागत असेल आणि कांदा उत्पादकांना भाव मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. कैलास चव्हान नावाच्या यवतमाळमधल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आम्ही मदत केली आणि आज तो सुखाने जगत आहे. जेव्हा सामूहिक प्रयत्न होतात तेव्हा त्याचं रूप मोठं होतं. विदर्भात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही चांगली बाब नाही. त्याची कारणं शोधून मार्ग काढण्याची गरज आहे. माझ्या स्वागतासाठी पुसद इथली लोक उभी होती. मी तयार नव्हतो म्हणून तिथे गेलो नाही. त्यामुळे तिकडचे लोक नाराज झाले. तेव्हा मी त्यांना बोलावून सांगितलं की तुम्ही इतके नीटनेटके आहात, मग पुसदमधली पूस नदी एवढी घाण का? आज ती नदीसुद्धा शुद्ध झाली.”
आमदार संजय गायकवाडांना टोला
यावेळी मकरंद अनासपुरे यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कमिशनच्या वक्तव्यावरही गमतीशीर टिप्पणी केली. “अलीकडच्या काळात लोक कमिशन आणि टक्केवारीवर थेट बोलत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. बाबूगिरी आणि खाबूगिरी यामुळे ईश्वराचा कोप असाच सुरू राहील,” असा टोला त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांच्या बळकटीसाठी आपण तब्बल 35 कोटी रुपयांचं कमिशन सोडल्याचा दावा गायकवाड यांनी केला होता.
“चंद्रपूरमध्ये मोहाची दारू बनते इतकीच आपली समज आहे, मात्र त्यापासून इतरही गोष्टी बनतात. आजच्या शिक्षणातून गेलेली श्रम- प्रतिष्ठा परत आणण्याची गरज आहे. शाळेतही जलसिंचन शिकवण्याची गरज आहे. आपण निसर्गाचा विचार केला नाही तर निसर्ग आपला विचार करणार नाही. अनेक झाडांची कत्तल होत आहे. माझ्यासमोर दिडशे वर्षापूर्वींची झाडं कापली जात होती. मिठी नदीचं नाव समोर आलं, तेव्हा कळलं की मुंबईमध्ये मिठी नदी आहे. मात्र मिठी नदीचा आज नाला झाला आहे,” असं अनासपुरे पुढे म्हणाले.