
मुंबईतील लोकलमधील वाढती गर्दी हा विषय नेहमी चर्चेत असतो. गर्दीमुळे पाय घसरून, खाली पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही आपण ऐकत असतो. पण याच गर्दीमुळे शनिवारी मालाड स्थानकात एका प्राध्यापकाचा दुर्दैवी अंत झाला. मालाड स्थानकावर झालेल्या हत्याकांडामुळे अख्खी मुंबई हादरली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं रुपांतर एवढ्या भयानक घटनेत होईल असा कोणी विचारही केला नव्हता, पण क्षणीक राग कोणाच्या जीवावर कसा बेतू शकतं याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे मालाडची ही घटना.
प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या आलोक कुमार यांचा सहप्रवाशाने भर स्टेशनवर काटा काढला. शुल्लक वादातून त्याने त्यांच्या पोटात चाकू खुपसत पळ काढला, मात्र यात आलोक कुमार सिंग यांचा हकनाक बळी गेला. त्यांच्या कुटुंबावर अक्षरश: शोककळा पसरली आहे. या घटनेचे नवनवे अपडेट्स सतत समोर येत असून आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. ज्या दिवशी आलोक कुमार सिंग यांचा मृत्यू झाला, त्या दिवशीच, म्हणजेच शनिवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवसही होता. बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी डिनरचा प्लान आखलेला, मात्र त्याच दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने मुंबईकर अक्षरश: हादरून गेले आहेत.
पत्नीच्या वाढदिवसानिमित्त कामावरून लवकर निघाले पण…
आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आलोक कुमार सिंग आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मुळचं लखनऊचं आहे. मात्र आलोक हे लहानपणापासूनच मुंबईत वाढले, मोठे झाले. असं असलं तरी त्यांचं संपूर्ण कुटुंब उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे राहतं. प्राध्यापर असलेले आलोक कुमार सिंग हे मुंबईतील एका खासगी कॉलेजमध्ये शिकवायचे. शनिवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता, त्यानिमित्त डिनरला जायचा प्लान ठरला होता. म्हणूनच आलोक हे नेहमीच्या वेळेपाज्ञा थोडे लवकरच कामावरून निघाले होते. पण तेच त्यांच्यासाठी घातक ठरलं.
शुल्लक वादावरून केली हत्या
कॉलेजमधून निघून घरी जाण्यासाठी आलोक कुमार यांनी ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणेच ट्रेनला प्रचंड गर्दी होती. आरोपी ओमकार शिंदे हा त्याच ट्रेनमध्ये आलोक यांच्या मागे होता. तो चर्नी रोड ते मालाड असा प्रवास करत होता. ट्रेनमध्ये असतानाच, मालाड येण्यापूर्वी आलोक कुमार सिंग व आरोपी ओमकार यांच्यात थोडा वाद झाला. खाली उतरण्यासाठी ओमकार हा आलोक यांना पुढे ढकलत होता, मात्र त्यांच्यापुढे महिला उभी होती, म्हणून आलोक यांनी ओमकराल धक्का न मारण्यास सांगितलं. त्यावरूनच त्यांचं वाजलं. बघता बघता ते भांडण पेटलं. तुला बघून घेईन अशी धमकी तेव्हा आरोपी ओमकारने आलोक यांना दिल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
लोकलमधून आधी उतरण्याच्या किरकोळ वादातून मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या.
आरोपी ओमकार शिंदेने धारधार चिमट्याने आलोक सिंग यांना भोसकलं.
आलोक सिंग यांच्या हत्येप्रकरणी आरोपी ओमकार शिंदे अटकेत.
लोकलमधील किरकोळ वाद आलोक सिंग यांच्या जिव्हारी. @TV9Marathi pic.twitter.com/EXLa0LLmiU
— Krishna sonarwadkar (@KrishnaSonarwa1) January 25, 2026
स्टेशनवर उतरताच साधला डाव..
अखेर मालाड स्टेशन येताच आलोक हे खाली उतरले, त्यांच्यामागोमाग आरोपी ओमकारही खाली आला. त्याने संधि साधली आणि हातातल्या धारदार शस्त्राने आलोक यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या पोटात शस्त्र खुपसून तो आरोपी पळून गेला.
आलोक यांना खप वेदना झाल्या, ते कळवळत होते. ते पाहून इतर प्रवाशांनी त्यांना खाली बसवलं, पोलिसांना कळवण्यात आलं. त्यांनी आलोक यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं खरं पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. तिथल्या डॉक्टरांनी आलोक यांना तपासून त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी ओमकार शिंदे याला बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.