
मालेगाव-मनमाड राज्य महामार्गावर रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण अपघाताची घटना घडली. मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे शिवारात खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पिकअपमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रॅव्हल्समधील २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मालेगावकडे जाणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास वऱ्हाणे गावाजवळील एका वळणावर समोरुन येणाऱ्या पिकअप वाहनाची आणि ट्रॅव्हल्सची अत्यंत वेगाने धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, पिकअप वाहनाचा पुढचा भाग अक्षरशः ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये घुसला. यात पिकअपचा चक्काचूर झाला. यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरुन गेला. वऱ्हाणे गावातील ग्रामस्थांनी यावेळी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र अंधार असल्याने सुरुवातीला बचावकार्यात अडचणी आल्या. पण यावेळी टॉर्चच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले. यानंतर पोलिसांनाही या अपघाताची माहिती देण्यात आली. तसेच मालेगाव तालुका पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.
या अपघातातील २ गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर इतर २० जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे पहाटेच्या वेळी मालेगाव-मनमाड मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस करत आहेत.
तर दुसरीकडे बीडच्या नेकनूर-येळंब महामार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले ३५ वर्षीय तरुण शेतकरी अमोल हांडगे यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आज रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळ्यातील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि केज तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
वाघेबाभळगाव येथील रहिवासी असलेले अमोल हांडगे आणि विक्रम हांडगे (३५) हे दोघे शेतकरी आपल्या कामानिमित्त नेकनूर येथे आले होते. काम आटपून सायंकाळच्या सुमारास ते दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते. याच दरम्यान, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना केज येथून बीडकडे घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन भरधाव वेगाने येत होती. नेकनूर-येळंब रस्त्यावर या पोलीस व्हॅनने अमोल यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अमोल हांडगे यांचा एक पाय जागीच तुटला होता आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमोल आणि विक्रम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान अमोल यांची प्राणज्योत मालवली.