
राज्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत अखेर इस्लाम (ISLAM) पक्ष आणि सेक्युलर फ्रंटने बाजी मारली आहे. शेख कुटुंबातील चौथ्या व्यक्तीने महापौरपदाची खुर्ची मिळवत मालेगावच्या राजकारणावर आपली पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नसरीन शेख यांनी महापौरपदाची शपथ घेतली आहे. तर उपमहापौर निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या शाने-ए-हिंद यांनी शिवसेनेचा धुव्वा उडवला.
मालेगाव महापालिकेत ८४ सदस्यांच्या सत्तेसाठी ४३ हा बहुमताचा आकडा आवश्यक होता. मालेगावच्या महापौरपदी नसरीन शेख या विराजमान झाल्या आहेत. त्या नगरसेवक खालिद शेख यांच्या पत्नी आहेत. यापूर्वी या कुटुंबातून शेख राशिद, शेख आसिफ आणि शेख ताहेरा दोन वेळा यांनी महापौरपद भूषवले आहे. आता पाचव्यांदा या कुटुंबाकडे महापौर आणि चौथ्या व्यक्तीकडे ही जबाबदारी आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेत एकाच कुटुंबातील ५ नगरसेवक आहेत.
तर मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी मोठी चुरस होती. समाजवादी पक्षाचे शाने-ए-हिंद यांना ४३ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार निलेश काकडे यांना केवळ १८ मते मिळाली. शाने-ए-हिंद यांनी २५ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसल्याने मालेगावात मोठी राजकीय खेळी खेळली गेली. इस्लाम पक्षाने (३५ जागा) काँग्रेस (३ जागा) आणि समाजवादी पक्षाला (५ जागा) सोबत घेऊन सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. या आघाडीमुळे सत्तेचा ३५ + ३ + ५ = ४३ हा आकडा गाठणे त्यांना शक्य झाले.
या निवडणुकीत एमआयएम (AIMIM) हा २२ जागांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. उपमहापौर पदासाठी एमआयएमच्या हाफिज अब्दुला मुफ्ती इस्माईल यांनी अर्ज भरला होता, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी एमआयएमने तटस्थ राहणे पसंत केले. भाजपनेही या प्रक्रियेत कोणालाही पाठिंबा दिला नाही. उपमहापौर पदासाठीची प्रक्रिया अत्यंत नाट्यमय ठरली. एकूण ४ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती.
सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. अखेरच्या क्षणी झालेल्या राजकीय तडजोडींनंतर शाने-ए-हिंद यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.