
पुरोगामी वारसा असलेल्या कोल्हापूरात आता एका स्मशानभूमीत भानामतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत एका पुरुष आणि महिलेने नग्न होऊन अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले आहे.यावेळी चितेच्या राखेखाली बाहुली, नारळ ठेवतं भानामतीचा भयंकर प्रकार केल्याचे उघडकीस आल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे.
कोल्हापूरातील जयसिंगपूरमधील उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीतील हा भयंकर प्रकार समोर आला आहे. जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. तेव्हा मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केला असल्याचा उघड झाल्याने नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामपंचायतीने सीसीटीव्हीची तपासणी केली असता खतरनाक प्रकार उघडकीस आला.
उदगाव ग्रामपंचायतीने सीसीटीव्हीची तपासणी केली असता या सीसीटीव्हीमध्ये महिला, पुरुष वेगवेगळ्यावेळी विशेषत: अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार अशा दिवशी भरदिवसा नग्न होवून अघोरी पूजा करीत असल्याचे समोर आले आहे. सातत्याने होत असलेल्या या करनी भानामतीच्या प्रकारामुळे उदगाव, जयसिंगपूरमध्ये खळबळ उडाली आहे. हे अंधश्रद्धेचे प्रकार उघड झाल्याने ग्रामपंचायतीने कडक पाऊल उचलण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे वैकुंठधामाची जबाबदारी घेऊन सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी होत आहे.