
श्रीराम क्षीरसागर, टीव्ही 9 मराठी डिजिटल : प्रेमात माणूस वेडा होतो, असे म्हटले जाते. एकमेकांना मिळवण्यासाठी प्रेमी जीवाचं रान करतात. पण हेच टोकाचे प्रेम कधी-कधी घातक ठरते. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरण राज्यभरात चर्चेत आले होते. गोविंद बर्गे हे कलाकेंद्रात नृत्यकाम करणाऱ्या पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडले होते. त्यांनी नंतर पूजा गायकवाड हिच्या बार्जी तालुक्यातील गावात जाऊन कारमध्येच स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. आता पुन्हा एकदा असेच एक हादरवून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. धाराशीवच्या साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे या तरुणाचे लग्न झालेले होते. तरीदेखील तो कलाकेंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या प्रेमात पडला होता. या तरुणाच्या आत्महत्याप्रकरणाने सगळीकडेच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात साई कला केंद्र आहे. येथे एक महिला नृत्यकाम करते. अश्रूबा अंकुश कांबळे नावाचा 25 वर्षीय तरुण या महिलेच्या प्रेमात होता. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघे अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. अश्रूबा कांबळे हा रुई ढोकी या गावचा रहिवासी होता. कला केंद्रात काम करणारी महिला आणि अश्रूबा कांबळे हे 8 डिसेंबर रोजी शिखर शिंगणापूर येते देवदर्शनाला गेले होते. पण परत येताना त्यांच्यात वाद झाला होता. हाच वाद नंतर वाढत गेला आणि यातूनच अश्रूबा या 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अश्रूबा आणि कलाकेंद्रात काम करणार नर्तकी शिंगणापूरहून परतत होते. याच वेळी अश्रूबा कांबळे या तरुणाला त्याच्या पत्नीचा फोन आला. त्यानंतर नर्तकी आणि अश्रूबा यांच्यात वाद झाला. हा वाद चालू असतानाच मी आत्महत्या करतो म्हणून अश्रूबा यांनी धमकी दिली होती. परंतु प्रेयसी नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या तरुणाने चोरखळी येथे गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ही घटना समोर येताच येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे असून पंचनामा केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. या नर्तकी महिलेने अश्रूबा कांबळे यांना त्रास दिला होता का? याचा पोलीस शोधघेत आहेत. दरम्यान या घटनेनंतर धाराशीवमध्ये खळबळ उडाली असून तपासात कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.