
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा नुकताच समावेश करण्यात आला. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ अनेक दिवसांपासून नाराज होते. परंतु धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले. आता फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ यांच्यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय तर पंतप्रधान देखील होऊ शकतात, असा उपरोधिक टोला कोकाटे यांनी मारला आहे. भुजबळ यांच्या मंत्रिपदामुळे मराठा-ओबीसी वाद होणार नाही, असे त्यांनी म्हटले.
नाशिकला पालकमंत्री देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे. भुजबळ उपमुख्यमंत्री झाले तरी मला चालतील. ते पंतप्रधान झाले तरी मला चालतील. माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नाही, असे कोकाटे यांनी म्हटले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या प्रश्नावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, शरद पवार साहेबांनी ५५ ते ६० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात घालवली आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांनी आता अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करावे. पवार साहेबांनी अजितदादांचे समर्थन केले, तर माझ्यासारख्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्याना आनंदच होईल, असे कोकाटे यांनी म्हटले.
रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या कोटवर टीका केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मी आज नाही तर पहिल्यापासून कोट घालतो. मला एक दिवस शेतकऱ्यांनाही कोट घालून फिरलेले बघायचे आहे. रोहित पवार यांना कोट घालण्यापासून कुणी अडवले आहे. त्यांनीही कोट घालून फिरावे. रुपाली चाकणकर यांचे महिला आयोगात चांगले काम सुरु आहे. त्या जबाबदारीने काम करत आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले.
राज्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. गेल्या दोन, तीन दिवसांपासून कोकण, मुंबई, पुणे या भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यातील पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला दिले आहेत. सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल, असे त्यांनी म्हटले.