मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, म्हणाले ‘आरक्षण हाच माझा उपचार’, आम्ही मुंडक्यावर चालतो का?

राज्य सरकारने अध्यादेश काढून वंशावळीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे असा निर्णय घेतला. मात्र, पूर्ण आरक्ष हवे अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरु ठेवले. तसेच, सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटमही दिला होता.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, म्हणाले आरक्षण हाच माझा उपचार, आम्ही मुंडक्यावर चालतो का?
CM EKNATH SHINDE AND MANOJ JARANGE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 11, 2023 | 10:28 PM

जालना : 11 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील अंतरवाली सराठी गावात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा चौदावा दिवस आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक चालू असतानाच जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची बातमी समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावली आहे. अंतरवाली सराठी येथील महिला, पुरुष यांच्याकडून जरांगे पाटील यांना औषध उपचार घ्या म्हणून विनंती करण्यात येत आहे. डॉक्टरचे पथकही उपोषण स्थळी दाखल झाले आहे.

अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांची आतापर्यंत अनेक नेत्यांनी भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानेही त्यांची तीनदा भेट घेतली. मात्र, आपल्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगे पाटील यांनी ‘आरक्षण हाच माझा उपचार’ असे सांगत पुढील उपचार करण्यास नकार दिला.

राज्यसरकारने सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण, बैठक झाल्यावर त्यांचे काय सुरू आहे ते कळेल असे ते म्हणाले. माझ्या तपासण्यापेक्षा आरक्षणबाबत तपासण्याच सुरू आहेत अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

मराठा समाजाने तुम्हाला भरभरून 75 वर्ष दिली त्याची परत फेड आरक्षण देऊन करा असे सांगून ते पुढे म्हणाले, सरकार चालवणारे काही दूध खुळे नाहीत. आज सरकारकडून कुणाचा फोन आला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, असा इशारा देत ते पुढे म्हणाले, ‘आरक्षणाबाबत माझ्या पाठीमागे सर्व पक्ष उभे राहतात का हे आता मला बघायचे आहे. ओबीसी समाज हा मराठा समाजाला साथ देईल. त्यांनी आंदोलन केल्याने काही होणार नाही. व्यवसाय नुसार सर्वाना आरक्षण आहे मग आम्हाला का नाही, आम्ही काय मुंडक्यावर चालतो का असा संतप्त सवालही त्यांनी केला.