निर्णायक लढ्यासाठी मनोज जरांगे पुन्हा सज्ज, आजपासून पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढणार? नवा प्लान काय?
मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा निश्चित केला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमधून जरांगे रवाना होणार आहेत. 12 ऑगस्टपर्यंत जरांगे पाटलांचा हा नियोजित दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जरांगे पाटील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं आणि निर्णायक आंदोलन होणार असल्याची घोषणा केली आहे. पार्श्वभूमीवर हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यात 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आलं. त्यानंतर या चारही लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. मनोज जरांगेंनी काल थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं होतं. जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. एकनाथ शिंदे हे डबल गेम खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली होती. या टीकेनंतर तातडीने मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम असल्याचे समजते. त्यांनी आजपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आखला आहे.
कसा असेल दौरा?
दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटी मधून रवाना
त्यानंतर तुळजापूर मध्ये समाज बांधवांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संवाद
सायंकाळी तुळजापूर मुक्कामी
8 ऑगस्ट
सकाळी 10 वाजता वडाळा उत्तर सोलापूर बैठक
दुपारी 3 वाजता माढा
सायंकाळी पंढरपूर दर्शन करून मुक्कामी
9 ऑगस्ट
सकाळी 10 वाजता सारकोली ता.पंढरपूर बैठक
दुपारी 3 वाजता सांगोला
सायंकाळी 7 वाजता प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आटपाडी मुक्काम
10 ऑगस्ट
सकाळी 10 वाजता कवठे महाकाळ
दुपारी 3 वाजता बोरगाव ता वाळवा
सायंकाळी 7 वाजता भेटी गाठी घेऊन कडेगाव मुक्काम
11 ऑगस्ट
सकाळी 10 वाजता मायणी ता. खटाव
दुपारी 2 वाजता मसूर ता कराड
सायंकाळी कराड मुक्कामी
12 ऑगस्ट
सकाळी 10 वाजता पाटण
दुपारी 3 वाजता सातारा