महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, वेगवेगळ्या घटनांमध्ये 89 जणांनी जीव गमावला, कुठे किती मृत्यू?

| Updated on: Jul 23, 2021 | 6:55 PM

पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. कुठं दरड कोसळली, कुठं पुरात नागरिक अडकले तर कुठं थेट कोव्हिड रुग्णालयात पाणी घूसून थेट रुग्णांना प्राण गमवावे लागले.

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, वेगवेगळ्या घटनांमध्ये 89 जणांनी जीव गमावला, कुठे किती मृत्यू?
Follow us on

मुंबई : पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. कुठं दरड कोसळली, कुठं पुरात नागरिक अडकले तर कुठं थेट कोव्हिड रुग्णालयात पाणी घूसून थेट रुग्णांना प्राण गमवावे लागले. राज्यातील विविध घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 89 जणांचा मृत्यू झालाय. यात चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटर, महाडमधील तळीये, साताऱ्यातील आंबेघर, रायगडमधील पोलादपूर आणि साताऱ्यातील वाईचा येथील घटनांचा समावेश आहे.

कुठे किती मृत्यू?

?तळीये, रायगड – 38
?पोसरे, रत्नागिरी – 17
?आंबेघर, सातारा – 12
?पोलादपूर, रायगड – 11
?चिपळूण कोव्हिड सेंटर- 8
?वाई, सातारा – 2
?दिगवळे, सिंधुदुर्ग – 1

चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट; व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेली महाराष्ट्रावरील संकटाची मालिका थांबताना दिसत नाही. चिपळूणमध्ये दरडी कोसळून 38 लोक दगावल्याची घटना ताजी असतानाच कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटिलेटरवरील 8 रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली. गेल्या 4 दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणात अनेक भागात पूर आला आहे.

चिपळूणमधील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्येही काल संध्याकाळी पाण्याचा मोठा लोट आला. त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी आणि चिखल झाला. त्यामुळे या कोविड सेंटरमधील वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाडमधील तळीये येथील दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल (22 जुलै) दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

साताऱ्यातील आंबेघर येथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू

साताऱ्यातील महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे.

गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी 3 कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

रायगडमधील पोलादपूर येथे भूस्खनल होऊन 11 जणांचा मृत्यू

रायगडमध्ये पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.

साताऱ्यातील वाई येथे भूस्खलन, 2 महिलांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील देवरूखवाडी येथे माळीण सारखी दुर्दैवी घटना घडली. भूस्खलन झाल्याने 7 ते 8 घरे जमिनीत गाडली गेली होती. यामध्ये 27 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर जखमींना वाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र या दुर्घटनेत 4 जण बेपत्ता झाले होते. यामध्ये दोन महिलांचा समावेश होता.

आज शोधकार्य करताना मातीच्या ढिगाऱ्याखालून 2 महिलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यामध्ये 60 वर्षाची वृद्ध महिला आणि 25 वर्षाची महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली रात्रीपासून अडकल्या होत्या. मातीचा ढीग अंगावर पडल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आला; व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

Raigad Satara landslide live : महाड, पोलादपूर आणि साताऱ्यात दरडी कोसळल्या, आतापर्यंत 71 मृत्यू

Weather update today : कोकणावर संकट कायम, पुढचे 3 दिवस धोक्याचे, IMD च्या अंदाजाने धाकधूक कायम

व्हिडीओ पाहा :

Many deaths in various incidents of land sliding in Maharashtra amid heavy rain