
Manoj Jarange Patil Visit Rajkot Fort : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर विरोधकांनीही यावेळी आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता याप्रकरणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात फायबरची मिलावट केली होती, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. आता त्यांच्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच राजकोट किल्ल्यावर जात घटनास्थळाची पाहणी केली. मनोज जरांगे हे काल रात्रीच मालवणमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला त्या घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठा दावा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता. त्यात फायबरची मिलावट होती, असं इथल्या काही बांधवांचं म्हणणं आहे. पश्चिमेकडून वारं येतं होता, मग पुतळा पूर्वेकडे पडायला हवा होता, तो पश्चिमेकडेच कसा काय पडला, या काही शंका आहेत. यात कोणतंही राजकारण होऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. याची सरकारने बारकाईने चौकशी करायला हवी. याप्रकरणी जो कोणी कंत्राटदार असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्ती असतील, त्यांना अजिबात सोडता कामा नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
आरोपीला आयुष्यभर जेलमध्ये ठेवायला हवं. सरकारचा अगदी बारीक लक्ष महापुरुषांचे स्मारक किंवा पुतळे यांच्याबद्दल असायला हवं. फक्त यात कोणतेही राजकारण करु नये. कोणी काहीही शंका उपस्थित केल्या, म्हणून त्या ग्राह्य धरुन नकार देण्याऐवजी यात काय खरं आहे, याचा शोध घ्यायला हवा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
“कंत्राटदार पळून जातोच कसा काय? तो आयुष्यभर जेलमध्ये सडायला हवा. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या घटनेचे राजकारण करत आहेत. तुम्ही एकमेकांवर चिखलफेक करता, आरोप करता, हे सर्व महाराष्ट्र बघत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर कोणीही राजकारण करु नये. नाहीतर जनता तुमचा कार्यक्रम करेल”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.