हवाच काढली… सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यापूर्वीच मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, आर या पार

Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सरकारकडून जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे बघायला मिळतंय.

हवाच काढली... सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यापूर्वीच मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, आर या पार
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 28, 2025 | 11:36 AM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, जरांगे पाटलांना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत. आज सकाळी 11 वाजता सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दोघे मिळून जरांगे यांची समजूत काढणार. मात्र, सरकारचे शिष्टमंडळ भेटण्यापूर्वीच जरांगे यांनी थेट आपली भूमिका स्पष्ट केली असून ते आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. हेच नाही तर उलट त्यांनीच काही मागण्या केल्या आहेत.

मराठा समाजाचा मोर्चा हा आहिल्यानगर जिल्हात पोहोचला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. जाणुनबुजून आपल्याला एक दिवसाची परवानगी दिल्याचा त्यांनी दावा केलाय. आमच्या आंदोलनावर लावलेल्या अटी शर्यती काढून घ्याव्यात असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासोबतच काही अटी देखील लावल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. अशी एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे गोरगरिबांची चेष्ठा आहे. काहीच होऊ नये, म्हणून तुम्ही जाणूनबुजून एकच दिवसाची परवानगी दिली. गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, मने जिंकण्याची तुम्हाला संधी आलीये. कधीच मराठा समाज तुम्हाला विसरणार नाही. एक दिवसाची परवानगी दिली, त्यामुळे मराठा समाजात नाराजी असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

यासोबतच जरांगे पाटील यांनी मोठी मागणी करत म्हटले की, मागण्या मान्य होईपर्यंत आम्हाला परवानगी द्यावी. गोळ्या झाडल्या तरीही आता आम्ही मागे हटणार नाहीत. आज रात्री शंभर टक्के आम्ही आझाद मैदानावर पोहोचणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचण्याच्या अगोदरच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत.