Manoj Jarange : नागाच्या शेवटावर पाय दिलात तर…, जरांगे पाटील यांचा कोणाला इशारा
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 16 वा दिवस आहे. आता चंद्रकांत बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 16 वा दिवस आहे. 15 सप्टेंबरला त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळणार आहे. जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार असल्याची घोषणा केली. त्यांनी 19 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागितली. पण पोलिसांनी परवानगी दिली नसून, पोलीस वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. यावर जरांगे पाटील यांनी ठोस भूमिका घेतली आहे. जरांगे म्हणाले, ‘आपली 19 तारीख ठरलेली आहे. आपण 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. न्याय देवतेचा सन्मान करुन उपोषणाला बसणार. आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आपल्या गरिबाच्या बाजूने न्याय देवता आहे.’
‘न्यायाधीश गरिबांच्या बाजूने असून, फक्त आपल्याच मराठ्यांच्याच नाही, तर सगळ्या जातीच्या बाजून न्यायाधीश आहेत. आपण अर्ज केला आहे. अर्ज केला नसता असता तर, असं म्हणाले असते, तू कायद्याला मानतच नाही… परवानगी द्यायची की नाही, ते फडणवीसांनी ठरवायचं. ते कायद्याला मानत असतील, संविधानाला मानत असतील, तर परवानगी देतील. न्यायदेवतेला मानत नसतील तर परवानगी देणार नाहीत.’
‘माझ्या मुंबईच्या बांधवांनी अर्ज दिला आहे. पण परवानगी अद्याप मिळालेली नाही. यापूर्वी देखील दोनवेळा त्यांनी असंच केलं. यापूर्वी मुंबईत येत असताना वाशी जवळ पोहोचल्यानंतर परवानगी दिली. गेल्या वर्षी पुण्यात गेल्यावर एक दिवस आधी परवानगी दिली. त्यांनी आता 18 ला परवानगी दिल्यानंतर आम्ही निघायचं केव्हा?’ असा प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
पुढे चंद्रकांत बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत जरांगे म्हणाले, ‘आंदोलनाच्या काळात दिसून आलं, यांच्यामनात मराठ्यांविषयी किती राग आहे. आमच्या टायमाला शनिवारी, रविवारी परवानगी नाही. धनगरांच्या टायमाला नाही. शेकऱ्यांच्या वेळेत शनिवार, रविवार येतो. आदिवासींच्या टायमाला शनिवार रविवार येतो… त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न आले की शनिवार – रविवार येतो. यांचं मंत्रालय बंद असतं, यांचा कलेक्टर बंद असतो. कलेक्टर फिरायला गेलेला असतो. आम्हीपण आता अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणार आहोत.’
‘नागाच्या शेपटावर पाय दिला म्हटल्यावर, आम्हाला देखील दाखवावं लागणार आमचं रक्त काय आहे ते… वाघाचं रक्त काय आहे. फक्त तुमच्या हातात कारभार असल्यामुळे तुम्ही उथळ आहात, आम्ही दमदार आहोत. दम धरुन फासा टाकतो.’ असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.