औरंगाबादचं नामांतर पेटलं, थोरातांच्या फोटोला जोडे मारो कार्यक्रम

| Updated on: Jan 02, 2021 | 1:32 PM

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली. | Aurangabad

औरंगाबादचं नामांतर पेटलं,  थोरातांच्या फोटोला जोडे मारो कार्यक्रम
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा आंदोलकांचा रोष दिसून आला. मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून शनिवारी औरंगाबादेत आक्रमक आंदोलन करण्यात आले. (Maratha kranti morcha agitation against congress leader Balasaheb Thorat)

यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली. तसेच या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही मराठा आंदोलकांनी निषेध केला. आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती.

तर ठाकरे सरकारला धोका, निरुपमांचा ‘औरंगाबाद’वर इशारा

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला.

‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणे हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. हा मुद्दा निवडणुकीचा नव्हे तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते आधी हटवा, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

काँग्रेस-शिवसेनेची नुरा कुस्तीच, निवडणुकीनंतर औरंगाबादचा ‘तो’ मुद्दा बाजूला पडेल: देवेंद्र फडणवीस

तर ठाकरे सरकारला धोका, निरुपम यांचा ‘औरंगाबाद’वर इशारा

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील

(Maratha kranti morcha agitation against congress leader Balasaheb Thorat)