
विधावसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज जालन्यातील वडीगोद्री गावात जावून ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. हाके आणि वाघमारे यांचं आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांची अवस्था पाहून विजय वडेट्टीवार यांचे डोळे पाणावले. पण याच मुद्द्यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. “मराठ्यांची इतकी मुलं गेली. मात्र त्या विरोधी पक्षनेत्याच्या डोळ्यांत पाणी आलं नाही आणि आज पाणी आलं. चांगलं आहे”, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला.
“भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील असं म्हणताय की, सगेसोयरे अंमलबजावणी करण्याची गरज नाही. पण आम्ही काय म्हणतोय हे सरकारने लक्षात घ्यावे. मी सरळसरळ सांगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शभूराज देसाई साहेब, आम्ही दिलेली व्याख्या मान्य असेल तर सगेसोयरे अंमलबजावणी करा. चंद्रकांत दादा म्हणतात, तसे करू नका. नाहीतर आमची फसवणूक होईल, ती करू नका. सगेसोयरे व्याख्याबाबत गेल्यावेळी आलेल्या शिष्टमंडळासोबत गोष्टी ठरल्या आहेत, आणि आता पुन्हा फसवणूक करताय”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“तुम्हाला देता येत असेल तर द्या. खोटी अंमलबजावणी करायची असेल तर करू नका. आम्हाला वेड्यात काढू नका. मुंबईत डझनभर सचिव आले होते. तिथं आम्ही व्याख्या लिहून दिली आहे. सुमित भांगे आणि केसरकर होते. मग आता धोक का देताय?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. “सरसकट कुणबी अशी आमची मागणी होती आणि हीच मागणी आहे. मध्येच काहीतरी खुळ काढताय, त्यात नोंद न मिळालेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार का? ते सांगा. मगच अंमलबजावणी करा. आतापर्यंत म्हणत होते, तुमच्याप्रमाणे देतो. आता चंद्रकांत पाटील वेगळी प्रेस घेताय, मंत्री गिरीश महाजन वेगळी भूमिका घेत आहेत”, असं जरांगे म्हणाले.
“13 जुलै पर्यंत यांच्यावर विश्वास ठेवू. त्यानंतर बघू. मी सगळं आयुष्य आरक्षणात घालणार म्हणजे घालणार. मराठ्यांच्या नेत्यांनी लाज वाटू द्या. तुमच्या लेकरांना आरक्षण नाही. त्यांना आरक्षण असून ते किती लढतात बघा. तुम्हाला विधानसभेला कळेल. तुम्हाला मराठ्यांची किती गरज आहे. आम्ही विश्वास ठेवला आहे. आंदोलन करणारे आपले विरोधक नाहीत. त्यांना विरोध नाही. मुलींचे पदवीपर्यंत शिक्षण मोफत करू म्हणाले. करत नाही, यांना करायचे नाही. यांना मराठ्यांना पिळायचे आहे. ते 10 टक्के न टिकणारे आरक्षण मान्य नाही. तसे सगेसोयरे आमची व्याख्या पाहिजे. तुमचं मान्य नाही. आम्ही 14 जुलैनंतर आमचं बघू, काय करायचं करू. 10 टक्के आरक्षण टिकणार नाही. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे, वरचे टिकणार नाही. तुम्ही 13 तारखेला फसवले की तुमचा कार्यक्रम केलाच समजा”, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.