मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग, ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री महत्त्वाची बैठक, नेमकी काय चर्चा झाली?
मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे. वर्षा निवासस्थानी मध्यरात्री महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

गिरीश गायकवाड : मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरावाली सरदाटीतील उपोषणाचा अकरावा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत सरकारच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतरही मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारी पातळीवर मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला महायुतीमधील दिग्गज नेते उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. वर्षा बंगल्यावरील ही बैठक रात्री दोन वाजता संपली. तसेच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड हे नेते होते उपस्थित होते. जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत नेमकी काय झाली, याविषयी अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांचा जरांगे पाटलांना फोन
सलग दहा दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांचं वजन कमी झांलं आहे. त्यांच्या रक्तातील साखर आणि बीपी देखील कमी झाला आहे. रात्री अडीच वाजता तपासणी केल्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी फोन करून सकाळपासून कार्यवाही सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर सलाईन घेतले. परंतु सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण न सोडण्याची भूमिका घेतली आहे. प्रकृती खालावल्यानंतर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखत टायर जाळले, तर आज देखील आंदोलनं होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये मराठा संघटनाची बैठक
नाशिकमध्ये आज मराठा संघटनांची राज्यस्तरीय महत्त्वाची बैठक होणार आहे. SEBC आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना SEBC मधूनच आरक्षण मिळतो. सरकारने SEBC आरक्षण टिकवून ठेवावे, असा मराठा संघटनांचा आग्रह आहे. मराठा समाजाचे SEBC आरक्षण घालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप, संघटनांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज राज्यस्तरीय बैठक होत आहे. बैठकीत कोणते निर्णय होणार, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागलं आहे.