
कल्याण येथील मराठी कुटुंबावर मारहाण प्रकरणी पोलिसांकडून आता कडक कारवाई केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला अटक केली आहे. त्याला अटक करण्याआधी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली? याबाबत पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी A टू Z माहिती दिली. “या प्रकरणात खडकपाडा पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची सध्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. आरोपीने तासाभरापूर्वी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओची आम्ही पडताळणी करत आहोत. सदर आरोपी हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार त्याला तिथून ताब्यात घेण्यात आलं आहे. आता आरोपीचं मेडिकल करुन त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे”, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
“इतर आरोपींना अटक करण्याबाबतही आमच्या टीमचं काम सुरु आहे. बाकीचे उरलेले आरोप आणि त्यांच्या साथीदारांना आम्ही लवकरात लवकर अटक करु. या प्रकरणात एकूण आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. अटकेची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर त्याला न्यायालयात नेण्याची प्रक्रिया केली जाईल”, असं अतुल झेंडे यांनी सांगितलं.
“जखमी अभिजित देशमुख यांचा जबाब नोंदवला जात आहे. त्याचप्रमाणे आम्ही मेडिकल सर्टिफिकेट प्राप्त करत आहोत. दोन्ही जबाब नोंदवल्यानंतर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत. जखमींचा जबाब आणि डॉक्टरांचं ओपिनियन जाणून घेऊन आम्ही या प्रकरणात कोणकोणती कायदेशीर कलमे वाढवायची याबाबत निर्णय घेणार आहोत”, असंही अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितलं.
“आमची चार पथकं या प्रकरणात कालपासून काम करत आहेत. या प्रकरणी आपल्याला आज सकाळी दोन आरोपी मिळाले. त्यानंतर आता मुख्य आरोपी मिळाला. अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने व्हिडीओ जारी केला असला तरी त्याला टिटवाळा आणि शहाडमधून आमच्या पथकाने अटक केली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“आम्ही कल्याणच्या एसीपींना पोलीस कारवाईला दिरंगाई झाली का? याबाबत चौकशी करण्यासाठी आदेश दिला आहे. या चौकशीला अहवाल प्राप्त होताच, या प्रकणात ज्यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्याचा अहवालात समोर आल्यानंतर योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत”, अशी महत्त्वाची माहिती पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
“सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे टोळके हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का, ते अद्याप समजू शकलेलं नाही. आम्ही त्यांची चौकशी करत आहोत. आरोपींचा पूर्व इतिहास घेण्याबाबतची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला वगळता इतर दोन आरोपींवर एमएसपी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे जुने गुन्हे आणि आताचा गुन्हा या अनुषंगाने आम्ही कडक कारवाई करत आहोत. शुक्ला यांचा रेकॉर्ड आम्ही चेक करत आहोत”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.