
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या, आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पहायला मिळाले, त्यानंतर या प्रकरणात उडी घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं. ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. त्यावरून देखील मोठा वाद झाला. या विधानावरून भाजपनं काँग्रेसला चांगलंच कोंडीत पकडलं. दरम्यान त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या हे मंगळवारी मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र त्यांच्या या दौऱ्याला मालेगावमधील महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी जोरदार विरोध केला आहे.
मालेगावच्या माहापौर नसरीन शेख यांनी यावरून किरीट सोमय्या यांना थेट इशारा दिला आहे. हात मे दंडा, पैर में चप्पल पहनकर आम्ही किरीट सोमय्यांचा विरोध करणार, असं नसरीन शेख यांनी म्हटलं आहे. मालेगावची बदनामी करणाऱ्यांना आम्ही मनपामध्ये येऊ देणार नाही, SIT चा आजपर्यंत अहवाल आला नाही, त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. मालेगाव शहरात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम केलं जातं असंही यावेळी शेख यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या महापौर?
‘ किरीट सोमय्या हे मालेगावात येत आहेत, हात मे दंडा, पैर मे चप्पल पहनकर आम्ही किरीट सोमय्यांचा विरोध करू, हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी जन्म दाखला प्रकरणात मालेगावचे नाव बदनाम केले. सर्व नगरसेवक, उपमहापौर आणि महापौर आम्ही सर्व त्यांना विरोध करू. मी महापौर आहे आणि शहरातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. किरीट सोमय्या यांना आम्ही रोखणार. महापौर, उपमहापौर, नगरसेवक एकत्रित येत त्यांना महापालिकेत येऊच देणार नाही, असं मालेगावच्या माहापौर नसरीन शेख यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मालेगावचे नाव खराब केलं जात आहे, आता प्रशासक राज नाही तर जनता राज आहे. 1044 लोकं या प्रकरणात अटकेत आहेत. मालेगावला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. मालेगावची बदनामी करणाऱ्याला आम्ही महापालिकेत येऊ देणार नाही. मालेगाव शहरात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम सुरू आहे, असा आरोपही यावेळी शेख यांनी केला आहे.