Ritu Tawde : त्या बाईच्या हातात बाळ होतं, रिक्षा मिळत नव्हती, त्यावेळी रितू तावडेंनी..सतत टोकाची टीका झेलणाऱ्या मुंबईच्या महापौरांचं कौतुकास्पद काम
सतत टोकाची टीका झेलणाऱ्या मुंबईच्या महापौरांचं एका कौतुकास्पद कामाचे कौतुक होत आहे. महापौर तावडे यांनी एक नवजात बाळ आणि तिच्या आईला स्मरणीय भेट दिली आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सतत टोकाची टीका झेलणाऱ्या मुंबईच्या महौपार रितू तावडे या एका चांगल्या कामासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. भर पावसात नवजात कन्येला घेऊन रिक्षाची वाट पाहणाऱ्या महिलेच्या मदतीला चक्क मुंबईच्या महापौर तावडे धावून आल्या आहेत. तावडे यांच्या या कार्याचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्याचबरोबर जोरदार वारा वाहत होता. त्यावेळी घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक महिला ही स्वत:च्या नवजात कन्येला घेऊन उभी होती. या महिलेला घरी जाण्याची घाई होती. महिलेच्या हातात बाळ आणि तासभर वाट पाहूनही रिक्षा मिळत नव्हती. त्यावेळी रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडताना महापौर रितू तावडे यांनी नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर तावडे या कारमधून उतरल्या. त्यांनी महिलेच्या डोळ्यांतली काळजी पाहून विचारपूस केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता महापौर तावडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
महापौर रितू तावडे यांनी त्या बाळंतीण महिला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या कारमध्ये बसवलं. त्यानंतर सुरक्षितपणे कुर्ला येथील खैरानी मार्गावर असलेल्या घरी पोहोचवलं. कारमध्ये स्वतः नवजात कन्येला कुशीत घेतलं. त्यानंतर घरी जाताना आईकडे सोपवलं. त्यासोबत तावडे यांनी महिलेला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि मातृ भावनेने आशीर्वाद दिला. गुरुवारी सायंकाळी हा प्रसंग घडल्याची माहिती मिळत आहे.
जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या त्या चिमुकलीचा हा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून झाला. मुंबईतील हा क्षण त्या बाळंतीण महिला, कुटुंबासाठी भावनिक ठरला आहे. महापौरांच्या वाहनातून प्रवास असा योग अत्यंत दुर्मीळ असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली. महापौर तावडे यांनी बाळाला प्रेमाने भेट देत तिचे स्वागत केलं. त्यासोबत आईला शुभेच्छा देत तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवलं. महापौर तावडे यांनी ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ असा संदेश त्यांनी कृतीतून दिला.